शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:16 IST

1 / 9
बांगलादेशच्या राजकारणातील 'आयर्न लेडी' आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या सर्वेसर्वा बेगम खालिदा झिया यांचे आज (मंगळवारी) पहाटे ६ वाजता निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ आजारामुळे गेल्या २० दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने बांगलादेशच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
2 / 9
खालिदा झिया या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांना कोणत्याही क्षणी मृत घोषित करण्यात येऊ शकते अशी त्यांची अवस्था होती. तरीही त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला होता. खालिदा झिया यांच्या नावाचा वापर निवडणुकीत केला जाणार होता. परंतू, उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या काही तासांतच झिया यांना मृत घोषित करण्यात आल्याने पक्षाच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे.
3 / 9
खालिदा झिया गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर, किडनी, मधुमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनावेळी त्यांचा मोठा मुलगा आणि पक्षाचा कार्याध्यक्ष तारिक रहमान १७ वर्षांच्या वनवासानंतर २५ डिसेंबरलाच लंडनहून परतला आहे. तर त्यांचा धाकटा मुलगा अराफात रहमान याचे २०१५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
4 / 9
दोन वेळा भूषवले पंतप्रधानपद खालिदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ या कालावधीत दोनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळली. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे पती जियाउर रहमान यांच्या हत्येनंतर त्यांनी पक्षाची धुरा हाती घेतली होती.
5 / 9
गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशची सत्ता खालिदा झिया आणि शेख हसीना या दोन ध्रुवांभोवती फिरत होती. खालिदा झिया यांच्या निधनानंतर आता बांगलादेश नॅशनल पार्टीची (BNP) संपूर्ण जबाबदारी त्यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या खांद्यावर आली आहे. मात्र, पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावरून मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. जुने निष्ठावान नेते आणि तारिक यांची कार्यपद्धती यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी आणि कलह वाढण्याची भीती राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
6 / 9
शेख हसीना यांच्या अवामी लीगसाठी विरोधक कमकुवत झाल्याने परिस्थिती काहीशी सोपी होऊ शकते. झिया याच जिवंत नसल्याने त्यांचे समर्थक आणि रहमान यांचे विरोधक यांच्यात फूट पडून त्याचा निवडणुकीत हसीना यांना फायदा होऊ शकतो.
7 / 9
बांगलादेशच्या राजकारणात बेगम खालिदा झिया यांचे नाव जितके आदराने घेतले जाते, तितकेच ते वादाच्या भोवऱ्यातही राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावरील 'पाकिस्तान समर्थक' आणि 'भारत-विरोधी' या आरोपांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या आरोपांनी केवळ बांगलादेशचेच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियाचे राजकारण प्रभावित केले होते.
8 / 9
शेख हसीना यांच्या अवामी लीगने खालिदा झिया यांच्यावर सातत्याने 'पाकिस्तान समर्थक' असल्याचा शिक्का मारला. याचे मुख्य कारण म्हणजे २०११ ते २००६ या काळात त्यांची 'जमात-ए-इस्लामी' या पक्षाशी असलेली युती. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात पाकिस्तानच्या लष्कराला साथ दिल्याचा आरोप या पक्षावर आहे. या युतीमुळेच खालिदा झियांच्या राजकारणाला 'कट्टरपंथी' छटा असल्याचे मानले गेले.
9 / 9
भारतासोबतचे ताणलेले संबंध खालिदा झियांच्या सत्ताकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये मोठी कटुता पाहायला मिळाली होती. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यावेळी गंभीर आरोप केले होते की, भारताच्या ईशान्येकडील उग्रवादी गटांना बांगलादेशच्या भूमीत आश्रय दिला जात आहे. हे लोक बांगलादेशातून भारतात हल्ले करत आहेत आणि झिया सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. यामुळेच खालिदा झिया या भारत-विरोधी भूमिका घेतात, अशी धारणा जागतिक स्तरावर तयार झाली होती.
टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान