कौतुकास्पद! बैरुत स्फोट पीडितांसाठी मिया खलिफाकडून खास वस्तूचा लिलाव; ७५ लाखांची लागली बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:45 PM2020-08-18T12:45:00+5:302020-08-18T13:09:05+5:30

लेबननची राजधानी असललेल्या बैरूत बंदरावरील एका वखारीत साठवून ठेवण्यात आलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटला आग लागल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १६० जण ठार, तसेच ५ हजार जण एकूण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ठिकठिकाणांहून धूरांचे प्रचंड लोळ निघत होते. या स्फोटाने संपूर्ण शहराच प्रचंड घबराट पसरली होती.

बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगभरातून या भीषण स्फोटानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागरिकांची या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी सढळ हस्ते या स्फोटातील पिडीतांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. यामध्ये आता पॉर्नस्टार मिया खलिफा हिनंही पुढाकार घेतला आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट लिहित मियानं आपण नेमकं कशी मदत करणार, याबाबतची माहिती दिली. 'मी थोडं क्रिएटीव्ह होण्याचा प्रयत्न करतेय. एखाद्या कामासाठी मतदनिधी उभारण्यासाठी अनेक मार्ग निवडले जाऊ शकतात. मात्र यामुळं मुख्य हेतूवरुन लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे', असं मियानं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

ही लक्षवेधी पोस्ट लिहित मियानं एका खास वस्तूचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. एका चाहत्यानं ही वस्तू तब्बल एक लाख डॉलर्सची बोली लावत ही वस्तू विकत घेतली.

मियानं बैरुत स्फोट पिडीतांसाठी लिलावात विकलेली ही वस्तू म्हणजे तिचा चष्मा. भारतीय चलनाप्रमाणे पाहिल्यास या चष्म्याचा लिलाव करत मियानं पिडीतांसाठी ७४ लाखांहून अधिक रक्कम मिळवली आहे.

इतकंच नव्हे, तर मियाने तिच्या इतरही काही वस्तू लिलावासाठी उपलब्ध केल्या आहेत. ज्याच्या लिलावातून जवळपास २५ हजार डॉलर्सचा निधी गोळा करण्याचा तिचा हेतू असल्याचं कळत आहे.

दरम्यान, बैरुतमधील भीषण स्फोटात अखेर लेबनॉनमधील सरकारचाही बळी गेला आहे. लोकांच्या वाढत्या रोषामुळे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजीनामा दिला आहे. सरकारचा हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार यामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. सरकारविरोधात तीव्र निदर्शनेही होत होती.

शेकडो लोक रस्त्यावर उतरत होते. स्थिती स्फोटक होत चालल्याचे पाहून पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रपती मायकेल आऊन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांना नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत काम पाहण्यास सांगितले आहे.

या स्फोटाचा तपास लेबनॉनच्या ‘सर्वोच्च न्यायालयीन परिषदे’कडे सोपविण्याचा निर्णय दियाब सरकारने घेतला होता. ही देशातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था आहे. देशाचे मावळते सार्वजनिक बांधकाममंत्री मायकेल नज्जर यांनी सांगितले की, नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन होईल.

Read in English