चर्चमधील पवित्र पेटारा वाचवण्यासाठी लोक जीवावर झाले उदार, ८०० भाविकांचा मृत्यू

By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 04:48 PM2021-02-22T16:48:56+5:302021-02-22T16:57:01+5:30

People sacrificed their lives to save the ark of covenant : मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे ८०० जणांना मारण्यात आले आहे. अनेक दिवसांपर्यंत रस्त्यांवर त्यांचे मृतदेह पडून होते.

इथिओपियामध्ये एक पवित्र Ark of Covenant (पवित्र पेटारा) ला वाचवण्यासाठी शेकडो लोकांनी आपला जीव गमावला आहे. हे आर्क इथिओपियामधील तिगरे क्षेत्रातील सेंट मेरी चर्चमध्ये सुरक्षा रक्षकांच्या कडक पहाऱ्यात सुरक्षित असते. हे आर्क ख्रिस्ती धर्मात पवित्र मानले जाते. दरम्यान, मिळत असलेल्या माहितीनुसार सुमारे ८०० जणांना सेंट मेरी चर्चच्या आसपास मारण्यात आले आहे. अनेक दिवसांपर्यंत रस्त्यांवर त्यांचे मृतदेह पडून होते.

गेटू नावाच्या एका प्राचार्याने येथील भयावह परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी टाइम्स वेबसाइटसोबत बोलताना सांगितले की, जेव्हा लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला तेव्हा ते चर्चमध्ये असलेल्या आणि पवित्र आर्कचे रक्षण करणाऱ्या पादरींच्या मदतीसाठी चर्चच्या दिशेने धावले. मात्र यापैकी अनेकजण गोळ्यांचे शिकार झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. त्यावेळी इथिओपियाचे पंतप्रधान अॅबे अहमद यांनी इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कची सेवा बंद केली होती. त्यामुळे इथिओपियाचे संपूर्ण जगासोबत असलेला संपर्क तुटला होता. मात्र आता तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे.

नोव्हेंबर महिन्यात या परिसरात तणाव वाढू लागल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. येथील चर्चमधील पवित्र पेटारा दुसऱ्या शहरात नेला जाईल आणि नंतर नष्ट केला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. दरम्यान, येथे आलेल्या लुटारूंनी लोकांवर कुठलीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी तुफान गोळीबार करून लोकांना ठार मारले.

अहमद सत्तेवर येण्यापूर्वी तिगरे पीपल्स लिबरेशन आर्मीने इथिओपियावर सुमारे २७ वर्ष राज्य केले होते. मात्र तिगरे या भागाची लोकसंख्या ही इथिओपियाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ६ टक्के एवढीच आहे. मात्र या विभागाचे राष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि मानावधिकारांच्या हननाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे तिगरे पीपल्स लिबरेशन फ्रंटच्या सरकारबाबत नाराजी वाढली आणि २०१८ मध्ये अहमद सत्तेवर आले.

इथिओपियाचे पंतप्रधान आबिय अहमद यांनी तिगरे क्षेत्रामध्ये लष्कराच्या एका शिबिरावर हल्ला झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी लष्कराला दिलेल्या आदेशानंतर तिगरे क्षेत्रात मुख्य राजकीय पक्षाने तेथील सुरक्षा दलांना लष्कराच्या उत्तर कमांड चौकीवर कब्जा करण्याचा आदेश दिला होता. स्थानिक सुरक्षा दलांनी तिथे लष्कराची शस्त्रास्त्रे, उपकरणे ताब्यात घेतली आणि तिथे तैनात असलेल्या सैनिकांना बंदी बनवले. तेव्हापासून या परिसरात यादवी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोरोनामुळे येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.