Corona Vaccine: केवळ एकच डोस पुरेसा; 'या' कंपनीची कोरोना लस मंजुरीच्या प्रतीक्षेत

By देवेश फडके | Published: February 25, 2021 11:57 AM2021-02-25T11:57:37+5:302021-02-25T12:01:41+5:30

शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी अथक परिश्रम करून कोरोनावर प्रभावी असणारी लस शोधून काढली. जागतिक स्तरावर कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लसींमध्ये आता आणखी एका लसीचा समावेश झाला आहे. J&J च्या कोरोना लसीला लवकरच अमेरिकेत मंजुरी दिली जाऊ शकते. आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसींचे दोन डोस घ्यावे लागत होते. मात्र, J&J च्या कोरोना लसीचा केवळ एक डोस (Single Dose Corona Vaccine) कोरोनावर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण जग ठप्प झाले होते. शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी अथक परिश्रम करून कोरोनावर प्रभावी असणारी लस शोधून काढली. (Corona Vaccine) जागतिक स्तरावर कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लसींमध्ये आता आणखी एका लसीचा समावेश झाला आहे.

जागतिक स्तरावरील सुमारे ८४ देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही कोरोना लसींना मान्यता दिली आहे. यातच आता जॉनसन अँड जॉनसन यांच्या कोरोना लसीची भर पडली आहे. अमेरिकेत ही कोरोना लस आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Johnson & Johnson च्या कोरोना लसीला लवकरच अमेरिकेत मंजुरी दिली जाऊ शकते. आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसींचे दोन डोस घ्यावे लागत होते. मात्र, J&J च्या कोरोना लसीचा केवळ एक डोस (Single Dose Corona Vaccine) कोरोनावर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेच्या 'एफडीए'च्या (Food and Drug Administration) शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, J&J ची लस कोरोनावर ६६ टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचा एकच डोस पुरेसा असून, ही लस अधिक सुरक्षित असल्याचेही एफडीए शास्त्रज्ञांकडून सांगितले जात आहे.

J&J च्या लसीमुळे कोरोना लसीकरणात तेजी येईल. J&J च्या कोरोना लसीला मान्यता मिळाल्यास अमेरिकेला तिसरी कोरोना लस मिळेल. लवकरच या लसीच्या मान्यतेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

अमेरिकेत आतापर्यंत सुमारे ४.४५ कोटी नागरिकांना फायझर किंवा मॉडर्ना कोरोना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. तर, सुमारे दोन कोटी नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अमेरिकेत आतापर्यंत फायझर आणि मॉडर्ना कोरोना लसीचा वापर केला जात असून, त्या ९५ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

J&J च्या कोरोना लसीचा एकच डोस घेतल्यानंतर इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे, ताप येणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. मात्र, या लसीचे गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भारतात आतापर्यंत दोन कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर भारतात देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील १३० पेक्षा जास्त देशांमध्ये अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस पोहोचलेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जागतिक स्तरावरील बहुतांश देशांतील नागरिकांना कोरोना लस मिळणे आवश्यक आहे. जगातील सर्व देशांमध्ये कोरोना लस पोहोचून लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात येऊ शकत नाही. त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.