'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा

By जयदीप दाभोळकर | Published: January 28, 2021 10:35 AM2021-01-28T10:35:04+5:302021-01-28T10:43:22+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांना विजय मिळाला. परंतु डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचा विजय स्वीकारण्यास तयार नव्हते. अनेकदा त्यांनी निवडणुकीच्या निकालात फेरफार झाल्याचाही आरोप केला होता.

त्यानतंर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचारही केला होता. दरम्यान, यानंतर ट्रम्प यांच्या महाभियोग लावण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. सीनेटला यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

तसंच आता ही प्रक्रिया ट्रायलच्या स्वरूपात पुढे जाईल. परंतु या सर्व गोष्टी असल्या तरी डोनाल्ड ट्रम्प यांना माजी राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतच राहणार आहे.

अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये पेन्शन, सुरक्षा आणि कार्यालय यांसारख्या सुविधांचा समावेश होतो.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार १९५८ मध्ये अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षांना आयुष्यभर काही सुविधा देण्यात येतात.

सध्याच्या नियमानुसार ट्रम्प यांना एक कार्यालय, सीक्रेट सर्व्हिस प्रोटेक्शन, १ लाख डॉलर्स प्रति वर्ष स्टाफसाठी आणि २.२ लाख डॉलर्सचं पेन्शन देण्यात येतं. यापुढे डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील या सुविधा मिळत राहणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना आपलं कार्यालय कोणत्या ठिकाणी हवं आहे याचा निर्णयदेखील ट्रम्प यांचाच असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच वॉशिंग्टनहून फ्लोरिडा येथे जाण्याचा निर्णय घेतला होता.

१९५३ मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यावेळी त्यांच्यावर मोठं कर्ज होतं. त्यानंतच राष्ट्राध्यक्षांना सुविधा पुरवण्याचा नियम करण्यात आला.

सध्या अमेरिकेत बिल क्लिंटन, जॉर्ज बुश, बराक ओबामा यांसारख्या माजी राष्ट्राध्यक्षांना या सुविधांचा लाभ मिळत आहे.

जर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कार्यकाळादरम्यान हटवलं गेलं तरच त्यांना या सुविधा देण्यात येणार नाही, असादेखील नियम आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू असली तरी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.