नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:07 IST
1 / 10काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये तिथल्या युवकांनी जोरदार आंदोलन सुरू केले होते. देशातील सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर या आंदोलनाचा भडका उडाला आणि तेथील पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2 / 10नेपाळ सरकारने सोशल मिडियावर बंदी आणली होती. त्यानंतर Gen Z भडकले आणि त्यांनी देशभरात आंदोलन सुरू केले. कालांतराने हे आंदोलन हिंसक झाले. त्यात सरकारी कार्यालये, पंतप्रधान निवासस्थान याठिकाणीही जाळपोळ सुरू झाली. अखेर सरकारला त्यांचा निर्णय मागे घेण्यास भाग पडले. परंतु तरीही आंदोलन शांत झाले नाही. 3 / 10बांगलादेश, नेपाळ प्रमाणे यावर्षी अनेक देशात Gen Z आंदोलने पाहायला मिळाली. नेपाळसारखे इंडोनेशियातही आंदोलन सुरू होते. आता पेरू येथेही युवक रस्त्यावर उतरले आहेत. २७ सप्टेंबरला पेरूची राजधानी लीमा येथे हजारो युवकांनी राष्ट्रपती दीना बोलुआते यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि विरोध प्रदर्शन सुरू केले. 4 / 10पेरूमधील या आंदोलनात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज अशा कारवाईचा वापर केला. त्याला प्रत्युत्तर देत युवकांनीही दगडफेक सुरू केली. पेरूमधील हा विरोध २० सप्टेंबरला पेन्शन प्रणालीत केलेल्या बदलानंतर सुरू झाला आहे.5 / 10नव्या नियमानुसार, पेरू येथे १८ हून अधिक वयातील प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या पेन्शन कंपनीशी जोडणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय राष्ट्रपती बोलुआते आणि खासदार यांच्याविरोधात दीर्घ काळापासून जनतेत असंतोष पसरला आहे. 6 / 10याचवर्षी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात इंडोनेशिया येथे युवकांनी रस्त्यावर उतरत खासदारांच्या वाढत्या भत्त्याविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. या आंदोलनात ८ जणांचा मृत्यू झाला. या आंदोलनाच्या दबावामुळे राष्ट्रपती प्रबोवो यांनी खासदारांचे निवासी भत्ते थांबवण्याचा निर्णय घेतला होता. 7 / 10१ सप्टेंबरला नेदरलँडमधील युवकांनीही आंदोलन केले होते. इस्रायलला मदत केल्याचा आरोप करत युवकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. युवकांच्या या आंदोलनानंतर सरकारने त्यांच्या धोरणात बदल करण्याचं आश्वासन दिले होते. ८ ते १३ सप्टेंबर या काळात नेपाळमध्ये तरुणांचे मोठे निदर्शने झाली. त्यांनी सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संसदेला वेढा घातला आणि आग लावली. या निदर्शनांमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आणि २,११३ जण जखमी झाले.8 / 10१० सप्टेंबर रोजी फ्रान्समधील तरुणांनीही अर्थसंकल्पात कपातीचा निषेध करण्यासाठी संप पुकारला. या आंदोलनातही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. इथली अर्थव्यवस्था ठप्प झाली. परंतु सरकारने त्यांच्या धोरणात बदल केला नाही. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान तिमोर-लेस्टे येथे Gen Z निदर्शकांनी खासदारांसाठी आजीवन पेन्शन आणि कारच्या योजनेचा निषेध केला. दबावाखाली सरकारला हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला, ज्यामुळे तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला.9 / 10२१ सप्टेंबर रोजी पूर नियंत्रण भ्रष्टाचाराच्या विरोधात फिलीपिन्समध्ये सुमारे १००,००० लोकांनी रॅली काढली. या निदर्शनादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला, २०५ जण जखमी झाले आणि २१६ जणांना अटक करण्यात आली. दबावाखाली, सभापती आणि सिनेट प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला.10 / 10२२ सप्टेंबर रोजी, इटलीमध्ये जनरल झेडच्या निदर्शकांनी गाझा युद्धाचा निषेध करण्यासाठी रेल्वे आणि बंदरांचे कामकाज विस्कळीत केले. तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. २५ सप्टेंबर रोजी मादागास्करमध्ये वीज आणि पाणी संकट आणि भ्रष्टाचाराविरुद्ध निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे तरुणांमध्ये संताप निर्माण झाला.