Coronavirus: अवघ्या ३० सेकंदात कोरोनाची लक्षणं दिसणार; भारतीय युवकाची कमाल, अमेरिकेनेही घेतली दखल

By प्रविण मरगळे | Published: November 25, 2020 06:49 PM2020-11-25T18:49:03+5:302020-11-25T18:51:34+5:30

कोरोनाबाबत जगभरात दहशत पसरली आहे. सर्व देश लस येण्याची प्रतिक्षा करत आहेत, तत्पूर्वी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुख्य आव्हान म्हणजे कोरोनाची तपासणी करणे हे आहे

अशा परिस्थितीत दिलासादायक बातमी अशी आहे की, झारखंडच्या कोडरमा येथे राहणाऱ्या एका तरूणाने असं कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान शोधले आहे, ज्यामुळे छातीच्या एक्स-रेच्या सहाय्याने कोरोनाची लक्षणे केवळ ३० सेकंदात शोधू शकतात.

हे तंत्रज्ञान टीबीची लक्षणे शोधण्यासाठी तयार केले गेले होते, परंतु ते कोरोनाच्या संदर्भात पुढे विकसित केले गेले. कोडरमा जिल्ह्यातील झुमरीतिलैया येथील अडी बंगला रोड येथील रहिवासी अंकित मोदी (वय २८) हे मुंबईतील एका कंपनीचे सह-संस्थापक आहेत.

अंकित मोदी यांच्या कंपनीने एक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. केवळ एका मिनिटात ब्रेनचं सिटी स्कॅन करून रिपोर्ट देण्यास सक्षम आहे.

खास गोष्ट म्हणजे अंकित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनवलेल्या या सॉफ्टवेअरला रेडिओलॉजिस्टची आवश्यकता नसते. हे सॉफ्टवेअर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटलीसह जगातील २० हून अधिक देशांमध्ये वापरले जात आहे.

अंकितचे वडील जितेंद्र कुमार अरुण एक व्यवसायिक आहेत. अंकित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या सॉफ्टवेअरची बातमी नुकतीच प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली आहे.

ज्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे रिपोर्ट येण्यासाठी अनेक दिवस आठवडे ताटकळत राहावं लागतं, त्याठिकाणी आता या सॉफ्टवेअरच्या मदतीने हाच अहवाल काही मिनिटांत बनविला जात आहे. पहिल्या दिवशी २५ ते ३० एक्स-रे पाहण्यास सक्षम असलेले डॉक्टर, आता त्यांना एका दिवसात १०० पेक्षा जास्त एक्स रे पाहतात.

अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत की, या रोगाची अगदी सूक्ष्म लक्षणे एक्स रेमध्ये असतात ते डोळ्यांनी पकडणे कठीण होते, डॉक्टर या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहजपणे अशी रुग्ण सहजपणे ओळखण्यात सक्षम आहेत.

अंकित मोदी म्हणाले की, दुर्गम खेड्यात आणि गावात जेथे एक्स-रे सुविधा आहेत परंतु रेडिओलॉजिस्टांची कमतरता आहे त्याठिकाणी रेडिओलॉजिस्टची कमतरता दूर करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी सिद्ध झाले आहे. झारखंडमधील सिमडेगा येथील शांतीभवन मेडिकल सेंटरमध्ये त्याचे एक वैशिष्ट्य दिसून आलं. अंकितने अमेरिकेतून मिळालेल्या हायप्रोफाईल नोकरीच्या ऑफरला नाकारून भारतात राहणं पसंत केले, देशात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्याने निर्णय घेतला.

अंकित मोदी यांनी २०१५ मध्ये आयआयटी कानपूर येथून कॉम्प्यूटर सायन्समध्ये बी.टेक आणि एम.टेक केले आहे. त्यांनी २०१६ मध्ये आपल्या ६ सहकाऱ्यांसह एक कंपनी स्थापन केली, जिथे त्यांनी संशोधन वैज्ञानिक म्हणून एक्स-रेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरवात केली. आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी प्रशांत वॉरियर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. डॉ. पूजा राव हे संशोधन पथकाच्या संचालक आहेत. अंकित सध्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.