शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Care: मोफत वैद्यकीय सेवा देणारे जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 11:36 AM

1 / 7
सद्यस्थितीत आपण भौतिक गोष्टींच्या एवढे आहारी गेलो आहोत की डॉक्टर म्हणताच आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते ती स्टेथोस्कोप लावलेल्या, पांढरा ऍप्रन घातलेल्या तसेच धीरगंभीर भावमुद्रा असलेल्या व्यक्तीची! मात्र आपण ज्या डॉक्टरांबद्दल जाणून घेणार आहोत ते भौतिक नसून नैसर्गिक डॉक्टर आहेत. या डॉक्टरांच्या सहवासानेही तुम्हाला बरे वाटू लागेल आणि उत्तरोत्तर तुमची तब्येत सुधारेल.
2 / 7
पृथ्वीवरून दिसणारा देव म्हणून आपण सूर्यपूजा करतोच, शिवाय त्याच्या सान्निध्यात राहण्याचे अनेक फायदे आहेत. दिवसभर सूर्य तापदायक वाटत असला तरी सकाळचे कोवळे ऊन शरीरासाठी हितावह असते. अनेक प्रकारच्या रोगांचा निचरा करण्याची ताकद सूर्यप्रकाशात असते. एवढेच नाही, तर जे लोक आपल्या दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वी उठून करतात त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक आयुरारोग्य लाभते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुम्हालाही निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवे असेल तर सर्वात आधी सूर्यदेव नावाच्या डॉक्टरांना दर दिवशी भेटा.
3 / 7
चांगले आरोग्य मिळावे यासाठी आपण जेवढे कष्ट करतो तेवढीच विश्रांतीही आवश्यक असते. ज्याप्रमाणे एखादे यंत्र अविरत चालत राहिले तर तर ते आपोआप बंद पडून विश्रांती घेते, त्याचप्रमाणे आपल्या देहाला पुरेशी विश्रांती गरजेची असते. ही विश्रांती वेगवेगळ्या स्वरूपात देता येते. रोजची आठ तास झोप, कामातून काही क्षण विरंगुळ्याचे काढून विश्रांती घेता येते. रोज सुरु असलेल्या खाद्यचक्राला उपास अर्थात लंघन करून विश्रांती देता येते. कामात बदल करून, छंद जोपासून, ध्यानधारणा करून मनाला, बुद्धीला, विचारांना विश्रांती देता येते. नव्हे तर ती देणे गरजेचे असते.
4 / 7
व्यायाम जोवर उत्साहाने करत नाही तोवर त्याचा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. दडपणाखाली व्यायाम न करता, हसत-खेळत आनंद घेत व्यायाम केला पाहिजे, तरच रोज व्यायाम करावासा वाटेल आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. एकच व्यायाम रोज न करतात, रोज वेगवेगळे व्यायाम केले तर त्यातले नावीन्य टिकून राहते आणि आपला उत्साहदेखील पुरून उरतो. चालणे, धावणे, झुंबा करणे, योगाभ्यास करणे असे व्यायामाचे विविध प्रकार आपल्याला अवलंबता येतात. सद्यस्थितीत वेळेशी युद्ध असल्याने सलग ४५ मिनिटं वयायाम करता आला नाही तरी टप्प्याटप्प्याने व्यायाम करावा. सुस्त पडून न राहता कार्यरत राहावे. शरीराची हालचाल जेवढी जास्त तेवढे व्यायामाचे अधिकाधिक फायदे होतील.
5 / 7
आहारातून ऊर्जा मिळते असे म्हणतात. पण अनेकांचा अनुभव सांगतो, की खाल्ल्यावर झोप येते. तुमच्याही बाबतीत हे होत असेल तर दोष आपल्या आहार शैलीत आहे हे जाणून घ्या. वदनी कवळ घेता या श्लोकातही वर्णन केले आहे की, 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म' म्हणजेच जेवायचे आहे ते पोट भरावे म्हणून नाही तर आपले शरीर यंत्र चालू राहावे म्हणून! यासाठीच शुद्ध, सात्विक आहार घ्यावा, त्यात कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या यांचा शक्य तेवढा नैसर्गिक वापर करावा.
6 / 7
उपास ही संकल्पना केवळ अध्यात्मिक नाही तर वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. आयुर्वेदात त्याला लंघन असे म्हणतात. मात्र आपण उपासाच्या नावावर उपासाचे पदार्थ शोधून काढत पळवाट काढली. त्यामुळे पोटाला आराम मिळण्याऐवजी दुप्पट मेहनत करावी लागते. उपासाचा तसेच लंघनाचा अर्थ आहे रोजच्या दिनचर्येत आपण खातो, ते पचावे आणि पचन यंत्रणा सुरळीत व्हावी म्हणून घेतलेला ब्रेक! त्यामुळे तोंडाला, पोटाला विश्रांती मिळते आणि पचन शक्ती वाढते. म्हणूनच आठवड्यातून एकदा उपास करावा असे शास्त्र सांगते. तसेच सक्ती म्हणून महिन्यातून दोन वेळा येणारी एकादशीचा दोन्ही वेळचा उपास करावा असे शास्त्राने नेमून दिले आहे. आपणही त्यानुसार विचार आणि प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.
7 / 7
वरील नैसर्गिक उपायांबरोबरच शरीराचा आणि मनाचा थकवा घालवणारे मित्र आयुष्यात असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जोवर आपल्या मनातल्या विचारांचा निचरा होत नाही तोवर नवीन कार्यासाठी, आव्हानांसाठी मन सज्ज होत नाही. यासाठी आयुष्यात विश्वासू मित्र जोडा. मोजकेच असले तरी जिवाभावाचे मित्र आपल्याला सुख दुःखात साथ देतात आणि तणावमुक्त जीवन जगायला प्रवृत्त करतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स