1 / 10Hair Transplant Surgery : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये केस प्रत्यारोपणानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या पत्नीने आरोप केला आहे की, योग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्लामसलत न करता प्रत्यारोपण करण्यात आल्यामुळे तिच्या पतीचा चेहरा सुजला. विशेष म्हणजे, 19 नोव्हेंबर 2024 रोजी त्याच क्लिनिकमधून केस प्रत्यारोपण केल्यानंतर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. मृताच्या कुटुंबाने आता 6 महिन्यांनंतर (13 मे) पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. या क्लिनीकमधील BDS झालेल्या महिला डॉक्टरने सर्जरी केल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.2 / 10 सध्या या दोन घटना खूप चर्चेत असून, केस प्रत्यारोपण सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. आजच्या काळात केस गळणे, तुटणे आणि टक्कल पडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी अनेकजण प्रत्यारोपणाचा पर्याय निवडतात. पण, ही प्रक्रिया योग्यरित्या, योग्य तपासणीनंतर आणि तज्ञांच्या देखरेखीखाली केली जात नाही, तोपर्यंत ती सुरक्षित मानली जाऊ शकत नाही. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, डॉ. शिवम गोयल(सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ आणि केस प्रत्यारोपण विशेषज्ञ, इटरनल हॉस्पिटल, जयपूर) यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे.3 / 10 प्रश्न- हेअर ट्रांसप्लांट म्हणजे काय? उत्तर – ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये डोक्याच्या टक्कल पडलेल्या किंवा गळणाऱ्या भागात केस लावले जातात. याला हेअर रेस्टोरेशन किंवा हेयर रिप्लेसमेंटदेखील म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया सहसा अशा लोकांसाठी असते, ज्यांनी यापूर्वी केस गळतीच्या उपचारांच्या इतर पद्धती वापरुन पाहिल्या आहेत, पण त्यांना फरक पडला नाही. आपले गेलेले केस परत आणण्याचा शेवटचा मार्ग म्हणून या सर्जरीकडे पाहिले जाते. केस प्रत्यारोपण प्रामुख्याने दोन तंत्रांचा वापर करून केले जाते.4 / 10 1- फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT) यामध्ये डोक्याच्या मागच्या बाजूतून त्वचेची एक पातळ पट्टी काढली जाते, ज्यामध्ये हजारो केस असतात. त्या त्वचेच्या पट्टीला सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने अनेक लहान ग्राफ्टमध्ये (फोलिक्युलर युनिट्स) विभागले जाते. प्रत्येक ग्राफ्टमध्ये 1-4 केसांची मुळे असतात. यानंतर, ज्या ठिकाणी केस कमी किंवा अजिबात नाहीत, अशा ठिकाणी लहान छिद्रे केली जातात आणि त्यामध्ये हे ग्राफ्ट बसवले जातात. काही आठवड्यांत तिथे नवीन केस वाढू लागतात.5 / 10 2- फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE) यामध्ये प्रथम ज्या भागातून केस काढायचे आहेत तो भाग ट्रिम केला जातो. नंतर सूक्ष्म पंच टूलच्या मदतीने केसांची मुळे (फोलिक्युलर युनिट्स) काढली जातात. यामध्ये सर्जिकल स्ट्रिप काढली जात नाही, त्यामुळे लांब कट किंवा टाके नसतात. FUE ची खासियत अशी आहे की, केस केवळ डोक्यावरुनच नाही, तर शरीराच्या इतर भागांमधून जसे की दाढी, छाती, पोट (पोट) आणि इतर अवयवांवरुनही काढले जाऊ शकतात. नंतर ज्या भागात केस नाहीत, तिथे लहान लहान छिद्र पाडून हे केस लावले जातात. 6 / 10 प्रश्न- केस प्रत्यारोपण कोणी करावी अन् कोणी करू नये? उत्तर- डॉ. शिवम गोयल म्हणतात की, ही प्रक्रिया प्रत्येकासाठी नाही. यासाठी काही आवश्यक अटी आहेत. ज्या व्यक्तीचे 40-50% केस गेले आहेत, त्यांनी ही ट्रिटमेंट करावी. याशिवाय, ज्यांना चांगला डोनर एरिया(जिथून केस काढायचे आहेत) आहे, त्यांनीच ही ट्रिटमेंट करावी. ज्यांना हार्मोनल डिसबॅलेन्सचा त्रास किंवा इतर गंभीर आजार आहेत त्यांनी ही ट्रिटमेंट टाळावी. याशिवाय, ज्यांना हाय डायबेटीज, ब्लड क्लॉटिंगचा आजार आहे, अशा व्यक्तींनी आणि 18-25 वयोगटातील तरुणांनी सर्जरी टाळावी.7 / 10 प्रश्न- केस प्रत्यारोपणापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? उत्तर: डॉ. शिवम गोयल सांगतात की, केस प्रत्यारोपण करण्यापूर्वी चांगल्या आणि अनुभवी केस प्रत्यारोपण सर्जनशी संपर्क साधणे गरजेचे आहे. मागील रुग्णांचा अनुभव आणि इतर सर्व महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. यानंतर, तुमच्या आरोग्य स्थितीबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्या. कोणताही आजार किंवा औषधे लपवू नका, कारण त्याचा तुमच्या शस्त्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या बाबतीत कोणते केस प्रत्यारोपण तंत्र (FUE किंवा FUT) चांगले असेल तेदेखील विचारा.8 / 10 प्रश्न- केस प्रत्यारोपणानंतर किती दिवसांनी केस वाढू लागतात? उत्तर- साधारणपणे केस प्रत्यारोपणानंतर केसांची वाढ टप्प्या टप्प्याने होते. 3 ते 4 महिन्यांत केसांची वाढ सुमारे 10 ते 20% दिसून येते. 6 महिन्यांत 50% केसांची वाढ होते. 8 ते 9 महिन्यांत सुमारे 80% निकाल दिसतात. केस प्रत्यारोपणाचे 100% निकाल 9 ते 12 महिन्यांत दिसून येतात. अशाप्रकारे केस प्रत्यारोपणाचा संपूर्ण परिणाम एका वर्षाच्या आत दिसून येतो. पण, हा निकाल प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळा असू शकतो. 9 / 10 प्रश्न- केस प्रत्यारोपणानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? उत्तर: केस प्रत्यारोपणानंतर योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून केसांची वाढ चांगली होईल आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. सर्जरीनंतर थेट उन्हात किंवा धुळीत जाणे टाळा. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घ्या. सर्जरीनंतर दोन दिवसांनी पट्टी काढण्यासाठी क्लिनीकमध्ये जा, घरी पट्टी काढू नका. नवीन केसांना हात लावू नका, खाजवू नका. पहिले सात दिवस डोक्यावरुन आंघोळ करणे टाळा. स्वीमिंग आणि हेवी व्यायामदेखील टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याशिवाय, काही दिवस मद्यपान-धुम्रपान टाळा. 10 / 10 प्रश्न- केस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम होऊ शकतात का? उत्तर: डॉ. शिवम गोयल स्पष्ट करतात की, केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरक्षित आहे, परंतु त्यानंतर काही सौम्य आणि तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात. हे सहसा काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत असतात आणि स्वतःहून जातात. जसे की- प्रत्यारोपित क्षेत्रावर लहान खरुज किंवा कोरड्या जखमा तयार होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या डोक्यावर थोडीशी खाज जाणवू शकते, जी बरे होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. काही लोकांना प्रत्यारोपणाच्या भागात मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. सुरुवातीच्या काही दिवसांत तुम्हाला सौम्य डोकेदुखी जाणवू शकते. कपाळावर किंवा डोक्याभोवती सूज येऊ शकते, जी हळूहळू कमी होते.