CoronaVirus News : माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय, संशोधनातून दावा

By सायली शिर्के | Published: October 21, 2020 03:26 PM2020-10-21T15:26:27+5:302020-10-21T15:39:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. रुग्णांची संख्या 41,093,940 लाखांवर पोहोचली असून आतापर्यंत 1,130,531 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू असून संशोधनातून सातत्याने महत्त्वाची माहिती समोर येत आहे. माऊथवॉशच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होत असल्याचा दावा आता रिसर्चमधून करण्यात आला आहे.

काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

वैद्यकीय नियतकालिक 'मेडिकल वायरोलॉजी' या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. काही माऊथवॉश आणि अँटीसेफ्टीक औषधं यांच्या वापरामुळे तोंडात असणारे व्हायरसचे प्रमाण कमी होऊ शकतं.

अमेरिकेतील पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्याच्या क्षमतेबाबत जाणून घेण्यासाठी काही माऊथवॉश आणि नेजोफेरिंजिअल रिन्जची चाचणी केली. यामध्ये कोरोना निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा संसर्ग फैलावणाऱ्या व्हायरसचे प्रमाण कमी करण्याची क्षमता या उत्पादनांमध्ये असू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर क्रेग मेयर्स यांनी याबाबत माहिती दिली आहे.

क्रेग मेयर्स यांनी कोरोनाला अटकाव करणारी लस येईपर्यंत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे. ज्या उत्पादनांची चाचणी केली, ती उत्पादने सहज उपलब्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसवर संशोधन केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे.

समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्ताची संख्या ही 10.6 मिलियन अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही असं देखील समितीने म्हटलं आहे.

समितीने दिलेल्या माहितीनुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 1.14 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

"गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या तसेच मृतांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र थंडीच्या दिवसात भारतात कोरोनाचा धोका कायम आहे."

"देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असला तरी नव्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर पडत आहे" अशी माहिती कोविड एक्सपर्ट पॅनलचे चीफ डॉ. व्ही. के पॉल यांनी दिली आहे.