CoronaVirus: अरे बापरे! कोरोनावरील कोणतीही लस घेतली, तरीही 'हे' साईड इफेक्ट्स दिसणारच?

By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 02:36 PM2020-11-26T14:36:16+5:302020-11-26T14:54:03+5:30

जगातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अमेरिकेत दररोज दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येतात. तर युरोपमधील काही देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

भारतातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण जग आता कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आहे.

सध्याच्या घडीला फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, स्पुटनिक व्ही या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या देशांनी लसी साठवण्याची, त्यांची वाहूतक करण्याची आणि लसीकरणाची तयारी वेगानं सुरू केली.

आतापर्यंत बहुतांश लसींचे शरीरावर फारसे गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत. मात्र लसीवर अतिशय वेगानं संशोधन झाल्यानं काही प्रमाणात साईड इफेक्ट्स दिसू शकतात, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

कोरोना लसीकरणाची तयार करताना मोदी सरकारनं सर्व राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या संभाव्य साईड इफेक्ट्सचा सामना करण्याची तयारी करण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.

मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आलेल्या एका व्यक्तीला १०२ डिग्री फॅरनहाईटपर्यंत ताप आला. मात्र काही वेळानंतर त्याची लक्षणं कमी झाली. याशिवाय लस टोचण्यात आलेल्या अनेकांना ताप आला. त्यांना थरथरण्याचाही त्रास झाला.

याशिवाय इतर लसींची चाचणी करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागला. जवळपास निम्म्या लोकांना अशा प्रकारचा त्रास झाला आहे.

लसीचा पचन यंत्रणेवर थोडा परिणाम होऊ शकतो. मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आलेल्या एका व्यक्तीला भोवळ आली होती. त्याला उलटी, मरगळ अशा प्रकारचा त्रासही झाला होता.

लस देण्यात आलेल्या शरीराच्या भागातल्या मांसपेशी दुखणं सर्वसाधारण बाब आहे. लस टोचण्यात आलेल्या भागात लाल चट्टे येतात.

फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका लसींचे दिलेले बरेचसे साईड इफेक्ट्स सारखेच आहेत.