आधी काय होईल? शेअर बाजार १ लाखांवर जाईल की इकॉनॉमी ५ ट्रिलियन डॉलर टप्पा गाठेल; Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:00 PM2022-11-21T13:00:14+5:302022-11-21T13:04:48+5:30

शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञ सकारात्मक असून, येत्या ३ ते ४ वर्षांत भारत ही दोन्ही लक्ष्य गाठू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आताच्या घडीला शेअर मार्केट नवीन विक्रमी घोडदौड करताना पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक ६२ हजारांच्या आसपास आहे. आगामी काळात शेअर मार्केटमध्ये आणखी उच्चांक दिसून येईल, असे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे मोठा फटका बसलेली देशाची अर्थव्यवस्था हळूहळू उभारी घेताना दिसत आहे. यातच देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यातच आगामी काही वर्षांत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असे म्हटले जात आहे.

महागाईचा प्रभावाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत असला तरी भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. दुसरीकडे, शेअर बाजाराने पुन्हा एकदा गतिमान होत नव्या विक्रमाकडे वाटचाल केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत देश प्रथम ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल की शेअर बाजाराचा निर्देशांत १ लाखांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी होईल, यावर आता तज्ज्ञ कयास बांधत आहेत.

शेअर बाजाराचे तज्ज्ञ आणि विश्लेषक भारत आणि भारतीय शेअर बाजाराबाबत उत्साही आहे. काही तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, देशांतर्गत अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सचा अतिशय महत्त्वाचा टप्पा गाढू शकेल. तर काहींना वाटते की, यापूर्वीच शेअर बाजाराचा निर्देशांक पुढील तीनच वर्षांचा १ लाख अंकांचा टप्पा ओलांडू शकेल.

विशेष म्हणजे, सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक ६१,६६३.४८ च्या पातळीवर बंद झाला. पीएमएस बाजारने गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात निधी व्यवस्थापक आणि शेअर बाजार विश्लेषक सहभागी झाले होते. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराबाबत तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

शेअर बाजाराचे विश्लेषक, समूह अध्यक्ष आणि येस सिक्युरिटीजचे संस्थात्मक इक्विटीजचे प्रमुख अमर अंबानी म्हणाले की, शेअर मार्केटचा निर्देशांक ३.५ वर्षांत १ लाखांचा टप्पा गाठू शकेल. महागाई आणि व्याजदरातील वाढ, रुपयातील स्थिरता आणि रोखे बाजार या घटकांमुळे बाजाराला नवी दिशा मिळेल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, राईट होरायझन्सचे सीईओ अनिल रेगो म्हणाले की, बाजाराची सध्याची स्थिती पाहता, असे दिसते की बेंचमार्क निर्देशांक ३ ते ४ वर्षांत १ लाख अंकांच्या पातळीला स्पर्श करू शकेल.

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचे झाले, तर सन २०२१ मध्ये सुमारे ३.२ ट्रिलियन डॉलर होती. पुढील पाच वर्षांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक वाटचाल करेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कार्नेलियन कॅपिटल अॅडव्हायझर्सचे संस्थापक विकास खेमानी म्हणाले की, तंत्रज्ञान, उत्पादन, बँकिंग, रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि उपभोग हे भारतातील मेगाट्रेंड आहेत.

अशा परिस्थितीत आपण २०२५ पर्यंत निश्चित लक्ष्य गाठू शकतो. बाजारातील दिग्गज आणि अबक्कस अॅसेट मॅनेजर एलएलपीचे संस्थापक सुनील सिंघानिया म्हणाले की, आम्ही भारताबाबत सकारात्मक आहोत आणि देशाचे लक्ष्य अगदी स्पष्ट आहे. २०२७ किंवा २०२८ पर्यंत आपण ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.