शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:18 IST

1 / 10
अदानी ग्रुपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रणव अदानी यांनी पहिल्यांदाच टीव्ही मुलाखतीत भविष्यातील भारत याबाबत दिलखुलासपणे भाष्य करत अदानी ग्रुपच्या मोठ्या योजनांचा आढावा दिला. येणाऱ्या काळात अदानी ग्रुप कोणत्या दिशेने काम करेल आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत अदानी ग्रुपची काय भूमिका असेल यावर त्यांनी उत्तर दिले.
2 / 10
२०२६ मध्ये पाऊल ठेवताना तुम्ही काय विचार करत आहात असा प्रश्न मुलाखतीत प्रणव अदानी यांना विचारण्यात आला. यावर प्रणव अदानी म्हणाले की, २०२६ बाबत बोलायचं झाले तर भविष्याकडे आम्ही खूप अपेक्षेने पाहत आहोत. आपण ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने चाललोय. पुढील ५ ते ७ वर्षात १० ट्रिलियन डॉलरचं ध्येय आपल्याला गाठायचे आहे असं त्यांनी सांगितले.
3 / 10
त्याशिवाय भारताच्या या विकास यात्रेत इन्फास्ट्रक्चरची मोठी भूमिका राहील. मग ते रस्ते असतील, एअरपोर्ट असतील, पोर्ट्स, ऊर्जा सेक्टर, यूटिलिटीज अथवा अर्बन सस्टेनेबल लिविंग याचा महत्त्वाचा भाग असेल. २०२६-२७ या काळात सरकारचा सर्वात मोठा फोकस हाच असेल असं मला वाटते असंही प्रणव अदानी यांनी म्हटलं आहे. आजतकच्या मुलाखतीत ते बोलत होते.
4 / 10
आज बहुतांश कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये का उतरत नाही असं प्रणव अदानींना विचारण्यात आले. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर असा व्यवसाय नाही जो सोपा आहे. त्यात अनेक आव्हाने आहेत. इथं गुंतवणूक केली आणि १-२ वर्षात रिटर्न मिळेल असा बिझनेस नाही. सुरुवातीचे काही वर्ष तुम्हाला सातत्याने पैसा लावावा लागतो. दीर्घ काळ गुंतवणूक हा विचार करावा लागतो. परंतु त्यासोबतच अनेक मोठ्या संधी आहेत असं प्रणव अदानींनी उत्तर दिले.
5 / 10
आज जर २५ वर्ष, ५० वर्ष यादृष्टीने व्यवसायाचा विचार केला तर एअरपोर्ट्स जे आम्ही विकसित करतोय. पुढील ५० वर्षाचा दृष्टीकोन त्यात आहे. त्याशिवाय वीज उत्पादन व्यवसाय आहे जो २५-५० वर्ष पुढचा विचार करतोय. आमचे चेअरमन गौतम अदानी कायम पुढील १५-२० वर्षाची तयारी करतात. आम्हीही २०४७ च्या विकसित भारताचं कल्पना करत आहोत. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून हे तेच व्यवसाय आहेत ज्यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे असंही प्रणव अदानींनी सांगितले.
6 / 10
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी अदानी ग्रुपचं काय योगदान असेल असा प्रश्न मुलाखतीत त्यांना केला. त्यावर आम्ही ज्या व्यवसायावर काम करतोय त्यात जगातील दिग्गज लीडर्स आहेत. मागील ५ ते ६ वर्षात भारतात विमानतळाच्या निर्मितीत अनेक सुधारणा झाल्यात. अनेक विमानतळाचं खासगीकरण झालंय आणि आता ते ग्लोबल बेंचमार्किंग स्तरावर काम करत आहेत. आमच्याकडे किती प्रवासी आले, किती समाधानी राहिले, आम्ही काय बदल केला याबाबत सातत्याने आढावा घेऊन सुधारणा करण्याचं काम आम्ही करतो असं प्रणव यांनी उत्तर दिले.
7 / 10
आज आमच्या ग्रुपमध्ये भारत आणि परदेशातील मिळून १५ बंदरे आहेत. परंतु आमचे लक्ष्य कायम रॉटरडॅम अथवा सिंगापूरसारख्या जागतिक स्तरावरील पोर्ट्सच्या टर्नअराऊंड टाइमसोबत तुलना करण्याचे आहे. अलीकडे आम्ही विजिंजम पोर्टचं उद्घाटन केले. हे भारतातील सर्वात मोठे ट्रांसशिपमेंट आहे. जगातील सर्वात मोठे जहाज याठिकाणी सहजपणे बंदरावर येऊ शकते. या क्षमतेमुळे आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये ते एक मजबूत उदाहरण बनले आहे असं प्रणव अदानी यांनी सांगितले.
8 / 10
प्रत्येक राज्यात गुंतवणूक अन् राजकारणापासून अंतर या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. सध्या भारतातील जवळपास २६ राज्यांत आम्ही गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय देशातील ४०० ठिकाणी आम्ही आहोत. जेव्हाही एखाद्या राज्यात गुंतवणुकीची आवश्यकता असते तेव्हा आम्ही तिथे असतो. भारतात प्रत्येक राज्य आता दुसऱ्या राज्यासोबत कोण किती गुंतवणूक घेऊन येते यावर स्पर्धा करत आहेत. कारण आजची युवा पिढी प्रश्न विचारत आहे असंही प्रणव अदानी यांनी सांगितले.
9 / 10
राजकीय आरोपांबाबतही प्रणव अदानींनी खुलासा केला. आज आपण एका लोकशाहीच्या देशात आहोत. प्रत्येकावर इथं जबाबदारी आहे. जर एखादा आरोप लागला तर त्याच्या तपासाच्या प्रक्रियेतून जावे लागते. हे सर्वांसोबत होते. जर तुम्ही प्रामाणिक असाल, पारदर्शी असाल तर कुठल्याही चौकशी अथवा आरोपांना घाबरण्याची गरज नाही. जर एखाद्या राज्यात कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असेल आणि ते राज्याच्या हिताचे आहे तर त्यातून तिथले राजकीय पक्ष तुम्हाला पसंत करतात अथवा नाही याचा फरक पडत नाही असंही प्रणव अदानींनी थेट सांगितले.
10 / 10
धारावी पुनर्वसनावरही ते बोलले. हा जगातील सर्वात मोठा शहरी पुनर्वसनाचा प्रकल्प आहे. जर धारावीचा इतिहास पाहिला तर मागील ४० वर्षापासून ते विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु काम पुढे जात नाही. आता सरकारने आंतरराष्ट्रीय निविदा काढली होती आणि त्या प्रक्रियेत अदानी ग्रुपची निवड झाली. हा प्रकल्प दीर्घ काळात खूप चांगले काम करेल. कारण मुंबई शहराच्या मध्यभागी हा प्रकल्प आहे. त्यात जवळपास २ लाख घरे बनणार आहेत. २००० पूर्वी जे लोक धारावीत राहत होते. त्यांना त्याच जागी घर मिळेल असं प्रणव अदानी यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीIndiaभारत