By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:03 IST
1 / 8अमेरिकेने इराणला दिलेली 'डेडलाईन' (मंगळवार रात्री ८) संपत आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक होत आहे. मात्र दुसरीकडे इराणही मागे हटण्यास तयार नाही. ट्रम्प यांच्या या आक्रमक इशाऱ्याने जागतिक बाजारात मोठा भूकंप आला आहे. 2 / 8ट्रम्प यांच्या धमकीनंतर, जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. याचा परिणाम थेट कच्च्या तेलाच्या दरांवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून या किंमतींनी चार वर्षांचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 3 / 8ट्रम्प यांची धमकी आणि कच्च्या तेलाचा भडका - ट्रम्प यांच्या धमकीनंतर ७ एप्रिल रोजी जागतिक बाजारात 'WTI क्रूड'ची किंमत २.२६ टक्क्यांच्या वाढीसह ११५ डॉलरवर पोहोचली आहे. तर 'ब्रेंट क्रूड' १११.२ डॉलरवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, 'इंडियन बास्केट'मध्ये ८.३५ टक्क्यांची मोठी वाढ होऊन दर १३०.९ डॉलरवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या या दर वाढीमुळे भारताचे टेन्शन वाढले आहे.4 / 8खरेतर, भारताला एकाच वेळी दोन धक्के बसले आहेत. एक म्हणजे, इंधनाची गरज भागवण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. मात्र, वाढत्या किमतींमुळे भारताचे टेन्शनही वाढले आहे. 5 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांवर दबाव वाढेल आणि आयातीचे बिल वाढेल. परिणामी, भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे अपरिहार्य होऊ शकते. 6 / 8दुसरा धक्का म्हणजे, सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी तेलाच्या किमती वाढवल्या आहेत. सौदी अरेबिया हा भारताचा एक प्रमुख पुरवठादार आहे, ज्याचा थेट परिणाम भारतावरही होईल.7 / 8सोने-चांदीच्या दरात वाढ - युद्धाच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओघ वाढला आहे. MCX वर सोन्याचा दर १५०,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे, तर चांदीची किंमत २,३३,०३० रुपये प्रति किलो झाली आहे.8 / 8इराण अमेरिका तणाव शिगेला - अमेरिकेने दिलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून सुरू असलेला हा वाद आता 'आर-पार'च्या लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे. ट्रम्प यांनी इराणला एका रात्रीत संपवण्याची धमकी दिल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.