शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:49 IST

1 / 8
वाढती महागाई आणि अनिश्चित भविष्य पाहता, आज प्रत्येक व्यक्तीसाठी विमा आणि आरोग्य सुरक्षा अत्यंत आवश्यक झाली आहे. विम्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागतो, या विचारानं सामान्य माणूस अनेकदा विम्यापासून दूर राहतो. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. केंद्र सरकारने अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये वार्षिक प्रीमियम १०० रुपयांपेक्षा कमी आहे आणि बदल्यात लाखो रुपयांचा लाभ मिळतो. या योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होण्यासाठी जास्त औपचारिकतांची गरज नाही.
2 / 8
बँक खातं किंवा आधार कार्ड यांसारख्या सामान्य कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करता येते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), आम आदमी विमा योजना (AABY) आणि निरामय आरोग्य विमा योजना यांसारख्या योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर ठरत आहेत. माहितीच्या अभावामुळे लोक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, मात्र थोडीशी जागरूकता त्यांना मोठी आर्थिक सुरक्षा देऊ शकते.
3 / 8
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अत्यंत कमी खर्चात मिळणारी अपघात विमा योजना आहे. याचा वार्षिक प्रीमियम केवळ २० रुपये असून तो थेट बँक खात्यातून कापला जातो. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळतं. १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात. रस्ते अपघात, कामाच्या ठिकाणी झालेला अपघात किंवा इतर आकस्मिक घटनांमध्ये ही योजना कुटुंबाला आर्थिक आधार देते.
4 / 8
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक सोपी आणि स्वस्त जीवन विमा योजना आहे. यात वार्षिक ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये दिले जातात. १८ ते ५० वयोगटातील लोक या योजनेत सामील होऊ शकतात आणि ५५ वर्षांपर्यंत हे संरक्षण सुरू राहतं. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना जीवन विम्याचा भक्कम आधार ठरू शकते.
5 / 8
आयुष्मान भारत योजना देशातील गरीब आणि दुर्बल घटकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना सरकारी आणि नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा मिळते. गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन उपचारांवर होणारा मोठा खर्च या योजनेमुळे बऱ्याच अंशी कमी होतो. आजारपणामुळे कर्जात बुडणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली आहे.
6 / 8
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा आयुष्मान भारतचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच दिलं जातं. यात रुग्णालयात दाखल होणं, शस्त्रक्रिया, तपासणी, औषधे आणि फॉलो-अप उपचारांचा खर्च समाविष्ट आहे. या योजनेसाठी कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही आणि उपचार पूर्णपणे कॅशलेस असतात.
7 / 8
आम आदमी विमा योजना विशेषतः ग्रामीण भाग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत अत्यंत कमी किंवा शून्य प्रीमियमवर जीवन विमा संरक्षण मिळतं. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रुपये आणि अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास ७५,००० रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो. ही योजना गरीब कुटुंबांसाठी कठीण काळात आर्थिक सुरक्षिततेचा एक विश्वासार्ह मार्ग आहे.
8 / 8
निरामय आरोग्य विमा योजना विशेषतः दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनेत नाममात्र प्रीमियमवर उपचार, औषधं, थेरपी आणि इतर आरोग्य सेवांचे संरक्षण मिळते. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्वाशी संबंधित आरोग्य गरजांचा समावेश करण्यात आला आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकार