आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम
By जयदीप दाभोळकर | Updated: April 1, 2025 09:37 IST2025-04-01T09:22:35+5:302025-04-01T09:37:19+5:30
Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे.

Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून टॅक्स डिडक्शन, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स आणि गुंतवणुकीशी संबंधित अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (MPC) एप्रिलमध्ये व्याजदरांबाबत निर्णय घेईल, ज्यामुळे गृहकर्जाचा ईएमआय कमी होऊ शकतो. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम करदाते, गृहकर्ज घेणारे, गुंतवणूकदार आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. विशेषत: करकपात आणि संभाव्य रेपो दरात कपात यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
नवी कर प्रणाली
अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर केलेली करकपात १ एप्रिलपासून लागू होणार आहे. नवी करप्रणाली आता अधिक फायदेशीर ठरली आहे, ज्यामुळे वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत (पगारासाठी १२.७५ लाख रुपयांपर्यंत) उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र, करसवलत मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक असणार आहे.
LPG सिलिंडर
राजधानी दिल्लीपासून मु्ंबईपर्यंत देशातील सर्वच महानगरांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यानुसार, कॉमर्शिल गॅस सिलिंडरचे दर ४ रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
... तर UPI बंद
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुरक्षा वाढविण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यूपीआयशी जोडलेला तुमचा मोबाईल नंबर बराच काळ अॅक्टिव्ह नसेल तर आजपासून त्या नंबरने पेमेंट करणं शक्य होणार नाही. हा बदल गुगल पे, फोनपे सारख्या यूपीआय अॅप्सना लागू असेल. जर तुमचा नंबर बराच काळ निष्क्रिय असेल आणि तुम्हाला यूपीआय पेमेंट सिस्टीम बंद करायची नसेल तर रिचार्ज करून घ्या.
रिवॉर्ड पॉईंट्स
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अॅक्सिस बँक आपल्या काही क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट पॉलिसीमध्ये बदल करत आहेत. एसबीआय सिम्पली क्लिक आणि एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम कार्डवरील रिवॉर्ड रचनेत बदल करणार आहेत. एअर इंडियाच्या विलीनीकरणानंतर अॅक्सिस बँकेच्या विस्तारा कार्डमधील बदल लागू होतील.
नवी पेन्शन योजना
मोदी सरकारने जुनी पेन्शन योजना (OPS) ऐवजी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) जाहीर केली होती, जी आज, १ एप्रिलपासून लागू झाली आहे. २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या १२ महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन मिळणार आहे. सरासरी बेसिक सॅलरी म्हणजे गेल्या १२ महिन्यांत बेसिक सॅलरी म्हणून मिळालेली रक्कम १२ ने विभागली जाते. नियमानुसार निम्मी रक्कम पेन्शनच्या रकमेची असेल. ही नवी योजना आता जुन्या पेन्शन योजनेची जागा घेईल. यात केंद्र सरकारच्या २३ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
जीएसटीचे नियम
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पोर्टलवर आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (एमएफए) अनिवार्य करण्यात आले आहे. १८० दिवसांपेक्षा जुन्या नसलेल्या कागदपत्रांवरच आता ई-वे बिल तयार करता येणार आहे. या बदलाचा थेट परिणाम व्यवसाय क्षेत्रावर होणार आहे.
मिनिमम बॅलन्स
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यासारख्या मोठ्या बँका मिनिमम बॅलन्सच्या मर्यादेत बदल करत आहेत. जर तुमच्या खात्यातील शिल्लक विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या खातेदारांसाठी हा बदल आवश्यक आहे.
डेबिट कार्ड
रूपे डेबिट सेलेक्ट कार्डमध्ये काही मोठे बदल अपेक्षित आहेत जे १ एप्रिलपासून लागू होतील. फिटनेस, वेलनेस, प्रवास आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. एका तिमाहीत कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाऊंड विजिट आणि निवडक लाऊंजसाठी १ वर्षात २ आंतरराष्ट्रीय लाऊंज सुविधा मिळेल. त्याशिवाय दुर्घटना झाल्यास किंवा कायमचं दिव्यांग झाल्यास १० लाख रूपयांपर्यंत पर्सनल एक्सिडेंट कव्हर मिळेल. प्रत्येक तिमाहीत एक फ्री जिम मेंबरशिप मिळेल.
TDS मध्ये बदल
TDS नियम अपडेट करण्यात आले असून अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि टॅक्सपेयर्ससाठी कॅश फ्लो सुधारण्यासाठी टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी व्याज दरावर लागणारा टीडीएस मर्यादा दुप्पट करत १ लाखापर्यंत करण्यात आली आहे. ज्यातून वृद्धांना आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. त्याशिवाय भाड्याच्या उत्पन्नावर मर्यादा वाढवून ६ लाखापर्यंत करण्यात आली आहे. ज्यातून घर मालकावरील बोझा कमी झाला आहे.
टोलचे दर वाढणार
नॅशनल हायवे अथॉरिटी ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून टोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम महामार्गावरील प्रवासावर होईल. NHAI ने विविध टोलचे दर वाढवले आहेत. त्यात लखनौहून जाणाऱ्या हायवेवर ५ रूपयांनी टोलचे दर वाढवले आहेत तर अवजड वाहनांच्या टोलच्या दरातही वाढ करण्यात आलीये. लखनौ-कानपूर,अयोध्या, रायबरेली, बाराबंकीसारख्या महामार्गावरील अनेक टोलचे दर वाढवले जातील. त्याशिवाय दिल्ली मेरठ एक्सप्रेस, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस, एनएच ९ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल टॅक्स जास्त द्यावा लागेल.