TATA : खिशात होते २१०००, सुरू केला व्यवसाय; आज आहेत २९ कंपन्या अन् २४ लाख कोटींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:08 AM2023-09-11T10:08:55+5:302023-09-11T10:21:13+5:30

टाटा समूह हे भारतातील एक प्रमुख औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे.

टाटा समूह हे भारतातील एक प्रमुख औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. भारतातील लोकांचा या ब्रँडवर वर्षानुवर्षे अतूट विश्वास आहे. मिठापासून ट्रकपर्यंत सर्व वस्तू बनवणाऱ्या टाटा समूहाचा इतिहास सुमारे दीडशे वर्षांचा आहे.

अवघ्या २१ हजार रुपयांपासून सुरू झालेला टाटा समूहाचा व्यवसाय आज २४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पण, यशाचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. यामागे एका व्यक्तीची मोठी भूमिका होती, ज्यांनी टाटा समूहाचा पाया रचला.

टाटा समूहाचे गॉडफादर जमशेदजी टाटा यांनी या मोठ्या व्यावसायिक साम्राज्याचा पाया रचला. गुजरातमधील नवसारी येथे जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी १८७० मध्ये व्यवसाय सुरू केला.

आपल्या मेहनतीने त्यांनी भारतात औद्योगिक क्रांती आणली. त्यांनी केवळ व्यवसायच नव्हे तर तंत्रशिक्षणाचाही प्रचार केला. त्यांच्या मेहनतीमुळे टाटा समूह वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयावर कसा राज्य करत आहे ते जाणून घेऊ.

जमशेदजी टाटा यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नुसरवानजी टाटा यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपलं पारंपारिक काम सोडलं. याचाच परिणाम जमशेदजी टाटा यांच्यावर झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ते वडिलांसोबत राहण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

जमशेदजी टाटा यांनी अशा वेळी व्यवसायात प्रवेश केला जेव्हा भारतीय लोक ब्रिटिश राजवटीमुळे निराश झाले होते. सुरुवातीला त्यांना काही अपयश आलं तरी त्यांनी हार मानली नाही. यानंतर १८६९ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी जमशेदजींनी २१,००० रुपयांच्या भांडवलानं मुंबईत अलेक्झांड्रा मिलची स्थापना केली. त्यांचा हा निर्णय टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचा पाया ठरला.

त्यांनी अनेक कल्याणकारी कामंही केली. जमशेदजींनी एम्प्रेस मिलमधील कर्मचाऱ्यांना भत्ते देण्यास सुरुवात केली, त्यामुळे टाटा समूहाची ओळख एम्पलॉई वेलफेअर ऑर्गनायझेशन म्हणून झाली. १८८० पासून ते १९०४ पर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी टाटा समूहाला उभं केलं. शैक्षणिक संस्थांपासून स्टील आणि मोटार उद्योगांची त्यांनी स्थापना केली.

आज टाटा समूहाच्या तब्बल २९ कंपन्या आहेत. ज्यात टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा स्टील, टायटन, तनिष्क, व्होल्टास, टाटा केमिकल्स, टाटा कम्युनिकेशन, ट्रेंट आणि टाटा एलक्सी यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांसह, टाटा समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३११ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २४ लाख कोटी रुपये आहे.