Success Story : दिल्लीच्या ‘गुप्ताजीं’नी कसं बनवलं ‘हवेली राम’ला ‘Havells’, रंजक आहे यशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:18 PM2023-04-24T12:18:45+5:302023-04-24T12:28:43+5:30

अनेकदा लोक नावाच्या आधारे ब्रँड स्वदेशी-विदेशी असल्याचा अंदाज लावतात.

अनेकदा लोक नावाच्या आधारे ब्रँड स्वदेशी-विदेशी असल्याचा अंदाज लावतात. जसे आर्चीस, रॉयल एनफिल्ड, पीटर इंग्लंड, हॅवेल्स इ. ही अशी नावे आहेत, जी वाचून तुमचा अंदाज येतो की ते परदेशी ब्रँड असतील, पण कधी कधी तुमचा अंदाज बरोबर नसतो.

असंच एक नाव म्हणजे हॅवेल्स. नावावरून ही कंपनी विदेशी वाटत असली तरी ही कंपनी एक स्वदेशी कंपनी आहे. आज आम्ही तुम्हाला या हॅवेल्सची कहाणी सांगत आहोत. दिल्लीच्या गुप्ताजींनी हवेली राम कंपनीला हॅवेल्स कसं बनवलं हे आपण आज जाणून घेऊ.

आज प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या हॅवेल्स ब्रँडच्या सुरुवातीची कहाणीही खूप रंजक आहे. पंजाबमधील मालेरकोटला येथील रहिवासी असलेले किमत राय गुप्ता हे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गुप्ता यांना नेहमीच स्वतःचा काही व्यवसाय करण्याची इच्छा होती.

त्यामुळे १९५८ मध्ये ते पंजाबमधून दिल्लीत आले. दिल्लीतील कीर्ती नगरमध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान सुरू केलं. पंखे, कुलर यांसारख्या इलेक्ट्रिकल गोष्टी दुरुस्त करण्याचं काम ते या ठिकाणी करत. हळूहळू त्यांनी १० हजार खर्चून गुप्ताजी अँड कंपनी सुरू केली.

इतकंच नाही, तर त्यांना बाजाराचीही चांगली माहिती होती. एके दिवशी त्यांना हवेली राम नावाचा व्यापारी आर्थिक अडचणीतून जात असल्याची माहिती मिळाली. त्यांना त्याची कंपनी विकायची होती. गुप्ता यांनी अजिबात उशीर केला नाही. कसे बसे पैसे उभारून त्यांनी हवेली राम गांधी कंपनी १९७१ साली ७ लाख रुपयांना विकत घेतली. त्यानंतर त्यांनी हवेली राम हे नाव बदलून हॅवेल्स असं ठेवलं.

गुप्ता यांना उत्तम व्यावसायिक ज्ञान होते. त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचं काम चांगलेच माहीत होते. १९७६ पासून त्यांनी दिल्लीतील कीर्ती नगर येथे त्यांचा पहिला उत्पादन कारखाना सुरू केला. जिथे ते स्विच, वायर यांसारख्या वस्तू तयार करत होते. यानंतर जणू त्याच्या कंपनीनं वेग पकडला. त्याच वर्षी, त्यांनी दिल्लीच्या बादलीमध्ये आणि १९८० मध्ये टिळकनगर येथे हॅवेल्सचे एनर्जी मीटर युनिट स्थापन केलं.

हळूहळू गुप्ता यांच्या कंपनीला विदेशी कंपन्या, चिनी उत्पादनांच्या आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी हे आव्हान ओळखून हॅवेल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू केलं. नवीन तंत्रज्ञान, दर्जा, लोकांच्या सोयी-सुविधा पाहता उत्पादनांमध्ये झपाट्यानं बदल होत होते. कंपनीनं पंखे, आयर्न वायर गिझर यांसारखी उत्पादनं बाजारात आणली.

गुप्ता यांनी कंपनी हाती घेतल्यानंतर हॅवेल्सनं प्रगती करण्यास सुरूवात केली. १९८० मध्ये हॅवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा (Havells India Private limited) पाया घातला गेला. उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

गुप्ता यांनी हे आव्हान पेललं. आता विस्तार करण्याची वेळ आली होती. २००७ मध्ये त्यांनी जर्मनीची मोठी कंपनी Sylvania चं अधिग्रहण केलं. क्रॅबट्री, सिल्व्हेनिया, कॉनकॉर्ड, ल्युमिनन्स आणि स्टँडर्ड यांसारख्या ब्रँड्सशी त्यांनी यानंतर करार केला.

कंपनीचा आज देशभरात आणि जगभरात विस्तार झाला आहे. कंपनीत ६५०० हून अधिक कर्मचारी काम करतात. हॅवेल्सची उत्पादनं ५० हून अधिक देशांमध्ये विकली जातात. २० हजारांपेक्षा अधिक व्यापारी भागीदार आहेत. कंपनीची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक आहे.