१५ वर्षांपूर्वी दिलेलं Ram Mandir उभारण्याचं वचन, गोष्ट L&T ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या नाईक यांची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:16 AM2024-01-23T08:16:56+5:302024-01-23T08:29:51+5:30

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा दावा आहे की, राम मंदिराच्या उभारणीसाठी १५ वर्षांपूर्वी L&T सोबत चर्चा झाली होती.

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडला. हे मंदिर लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपनीनं उभारलेलं आहे. जगातील सर्वात मोठ्या इन्फ्रा कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो. देश-विदेशात त्यांनी अभियांत्रिकीचं उत्तम उदाहरण असलेले प्रकल्प उभारले आहेत. मुंबईतील अटल सेतू, गुजरातमधील सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आणि ओडिशातील जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम यांचाही यात समावेश आहे.

स्वातंत्र्यापूर्वी दोन परदेशी इंजिनिअर्सनं त्याची स्थापना केली होती, पण त्याला मोठ्या उंचीवर नेण्याचं श्रेय ए.एम. नाईक यांना जाते. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा दावा आहे की, राम मंदिराच्या उभारणीसाठी १५ वर्षांपूर्वी L&T सोबत चर्चा झाली होती. तेव्हा कंपनीचे प्रमुख ए.एम.नाईक यांनी ते बांधण्याचं आश्वासन दिले होते. ५८ वर्षे L&T चे प्रमुख असलेले ए.एम. नाईक यांना एकदा याच कंपनीत नोकरी नाकारण्यात आली होती. ए एम नाईक यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकू.

नाईक हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते आणि त्यांचे वडील तसंच त्यांचे आजोबा दोघेही शिक्षक होते. ते गुजरातमधील शाळेत शिकवत असत. नाईक यांचं सुरुवातीचं शिक्षण गावातील शाळेतून झालंय. त्यांनी गुजरातच्या बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलं. जेव्हा त्यांनी नोकरी शोधण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांनी एल अँड टीमध्ये अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. एल अँड टीमध्ये त्यावेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जात होतं.

ETPanache ला त्यांनी २०१८ मध्ये मुलाखत दिली होती. एल अँड टीमधून रिजेक्ट केल्यानंतर आपण नेस्टर बॉयलर्समध्ये नोकरी सुरू केल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एल अँड टी मध्ये हायरिंग सुरू केल्याचं त्यांना समजलं. त्यावेळी ते पुन्हा त्या ठिकाणी गेले. त्यांना त्यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसंच त्यांना इंग्रजी सुधारण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदा त्यांना कमी पगारावर ज्युनिअर इंजिनिअर पदावर नियुक्त करण्यात आलं. १५ मार्च १९६५ रोजी त्यांनी तिकडे नोकरी करण्यास सुरूवात केल्याचं त्यांनी सांगितलं.

एल अँड टीमध्ये कामावर रुजू झाले तेव्हा नाईक यांचं वेतन ६७० रुपये प्रति महिना होतं. त्यावेळी त्यांना आपण १००० रुपये वेतनावर रिटायर होऊ असं वाटलं होतं. परंतु सहा महिन्यांनंतर त्यांचं वेतन ७६० रुपयांवर गेलं. एका वर्षानंतर त्यांना ९५० रुपये वेतन मिळू लागलं. युनियन अॅग्रीमेंटनंतर त्यांच्या वेतनात पुन्हा ७५ रुपयांची वाढ झाली आणि त्यांचं वेतन १०२५ रुपयांवर पोहोचलं. तसंच नंतर ते ज्युनिअर इंजिनिअरवरून असिस्टंट इंजिनिअर बनले.

१९९९ मध्ये नाईक त्याच कंपनीचे सीईओ बनले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना एल अँड टी समूहाच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी आपलं काम आणि मेहनतीच्या जोरावर हे पद मिळवलं.

त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचीही मोठी प्रगती झाली. २०२३ मध्ये कंपनीचं एकूण असेट्स ४१ अब्ज डॉलर्स होतं. कंपनीनं डिफेन्स, आयटी, रियल इस्टेट अशा अनेक क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केलं. आज कंपनीचा ९० टक्के महसून त्या व्यवसायातून येतो जो नाईक यांनी सुरू केला.

आपल्याकडे २ जोडी बूट, ६ शर्ट आणि २ सूट असल्याचं त्यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. आपलं वॉर्डरोब किती भरलंय याकडे लक्ष न देता आपलं काम चालावं इतकंच सामान आपण ठेवतो असं ते म्हणाले. २०१७-१८ मध्ये त्यांचं वेतन १३७ कोटी रुपये होत. त्यांचं नेटवर्थ ४०० कोटी रूपये होतं. २०१६ मध्ये त्यांनी आपली ७५ टक्के संपत्ती दान केली.

जर आपला मुलगा आणि सून अमेरिकेहून परत आले नाहीत, तर आपली संपूर्ण संपत्ती दान करून असं त्यांनी सांगितलं होतं. ते दोघंही डॉक्टर आहेत. ते आपल्या संपत्तीचा बहुतांश हिस्सा शाळा आणि रुग्णालयांच्या चॅरिटीवर दान करतात. त्यांनी २०२२ मध्ये १४२ कोटी रूपयांचं दान दिलं होतं.