जपानहून येतो कागद अन् स्वित्झर्लंडची शाई...भारतीय नोट कशी बनते माहित्येय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 02:02 PM2021-03-15T14:02:23+5:302021-03-15T14:15:18+5:30

भारतीय चलनाची छपाई नेमकी कुठे होते? ती कशी होते? एका दिवसात नेमक्या किती नोटा छापल्या जातात आणि त्या कशा छापल्या जातात? याचा विचार कधी केलाय का? जाणून घेऊयात भारतीय चलनाच्या छपाई संदर्भातील माहिती...

देशात कोट्यवधी किमतीच्या नोटा चलनात आहेत. पण या नोटांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत? नोटांसाठी लागणारा कागद कुठून येतो आणि छपाई केंद्र कुठे आहे? याची माहिती जाणून घेऊयात..

देशात नोटांच्या छपाईची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे.

देशात एकूण चार ठिकाणी नोट छपाईसाठीच्या प्रिटिंग प्रेस आहेत.

देशात पहिली नोट ब्रिटीश सरकारनं १८६२ साली चलनात आणली. या नोटेची छपाई ब्रिटनमध्ये झाली होती.

भारतात नोट छपाईची पहिली प्रेस १९२६ साली महाराष्ट्रातील नाशिक येथे सुरू झाली.

. त्यानंतर १९७५ साली मध्य प्रदेशच्या देवास येथे देशातील दुसरी नोट छपाईचा कारखाना सुरू करण्यात आला.

देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता १९९९ साली कर्नाटकच्या म्हैसूर येथे नोट छपाईचा तिसरा कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर २००० साली पश्चिम बंगालच्या सलबोनी येथे नोट छापण्याची चौथी प्रेस सुरू झाली.

नोटांसोबतच नाणी, सरकारी मेडल आणि पुरस्कारांबाबत बोलायचं झालं तर इंडियन गर्व्हनर मिंट द्वारे याची निर्मिती केली जाते. नाणी आणि मेडल मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे तयार केले जातात.

भारतीय नोट छापण्यासाठी जो कागद वापरला जातो त्याचा ८० टक्के कच्चामाल जापान आणि ब्रिटनमधून आयात केला जातो. तर उर्वरित २० टक्के माल मध्य प्रदेशच्या होशंगाबाद स्थित पेपर मिलमध्ये तयार केला जातो.

भारतीय चलनासाठी लागणारी शाई स्वित्झर्लंडच्या 'सीआयसीपीए' या कंपनीकडून आयात केली जाते.