दिवसाला १० लाख देण्यासाठी तयार होती 'ही' कंपनी; पण विराट बनला नाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, कारण काय?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 11, 2025 10:45 IST2025-04-11T10:35:23+5:302025-04-11T10:45:10+5:30

कोहलीनं २०१७ मध्ये या कंपनीसोबत तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला होता. आता पुन्हा कंपनीनं ३०० कोटी रुपयांच्या कराराला आणखी आठ वर्षे मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) जर्मन स्पोर्ट्स ब्रँड प्युमासोबतचा (Puma) आठ वर्षांचा करार रद्द केला आहे. कोहलीनं २०१७ मध्ये प्युमासोबत तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला होता. प्युमानं ३०० कोटी रुपयांच्या कराराला आणखी आठ वर्षे मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती.

म्हणजेच दरवर्षी ३७ कोटी, महिन्याला तीन कोटी आणि किंग कोहलीला दररोज १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास कंपनी तयार होती. मात्र, कोहलीने प्युमाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्यास नकार दिला. कोहली आता अगिलिटास (Agilitas) नावाच्या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी गुंतवणूकदार म्हणून जोडला गेला आहे. या कंपनीची स्थापना २०२३ मध्ये प्युमा इंडियाचे साऊथ इस्ट एशियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी केली होती. विराट कोहली सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असून त्याची नेटवर्थ १०५० कोटी रुपये आहे.

"प्यूमा विराटला त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. आम्ही वर्षानुवर्षे एक संस्मरणीय भागीदारी केली आहे, ज्यात मोठी कॅम्पेन्स आणि प्रोडक्ट कोलॅबरेशन्स केली होती. प्युमा उदयोन्मुख खेळाडूंमध्ये गुंतवणूक करत राहील आणि भारतातील क्रीडा इकोसिस्टम अधिक मजबूत करेल, असं प्युमा इंडियानं विराटसोबतची भागीदारी संपल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटलं. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या व्यावसायिक कामकाजाची देखरेख करणारी सल्लागार कंपनी स्पोर्टिंग बियॉन्डनं (Sporting Beyond) यावर भाष्य करण्यास नकार दिला.

आता कोहलीचे लक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला लाईफ स्टाईल आणि अॅथलीजर ब्रँड one8 चा विस्तार करण्यावर आहे. अगिलिटाससोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून कोहलीनं one8 ला जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. विराट कोहली हा भारतातील लोकप्रिय ब्रँड अॅम्बेसेडर असून तो अनेक वेगवेगळ्या कंपन्यांशी जोडला गेला आहे.

विराट कोहली टायर उत्पादक एमआरएफचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. विराट कोहली ऑडी इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर असून या ब्रँडसोबत त्याची भागीदारी २०१५ पासून सुरू आहे.