'PM सूर्य घर योजने'चा लाभ घ्यायचाय, पण पैसे नाहीत; SBI करेल मदत, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 04:06 PM2024-04-06T16:06:51+5:302024-04-06T16:12:21+5:30

पीएम सूर्य घर योजनेत 300 युनिट मोफत वीज दिली जाते.

PM Surya Ghar Yojana: केंद्र सरकारने अलीकडेच 'पीएम सूर्य घर' (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत विजेचा लाभ दिला जातो. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. फक्त अर्जदाराच्या घराच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. सरकार पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सबसिडीदेखील देत आहे, परंतु त्यापूर्वी अर्जदाराने सोलर रूफ टॉप बसवणे आवश्यक आहे.

सोलर रुफटॉप बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. सोलर रुफटॉप बसविण्याचा खर्च किलोवॅटनुसार असतो. या हिशोबाच्या आधारेच सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत किमान 30,000 रुपये अनुदान दिले जाते. पण, तरीदेखील तुम्हाला तुमच्या खिशातून मोठी रक्कम खर्च करावी लागते. पण, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, या योजनेसाठी बँकेकडून कर्जही पुरवले जाते.

SBI कडून मिळते कर्ज- तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पण तुमच्या घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी पैसे नसतील, तर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI कर्ज देईल. एसबीआयने या योजनेअंतर्गत कर्ज योजना सुरू केली आहे. पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. ही कर्जाची रक्कम कोणाला मिळेल आणि व्याजदर काय असेल हे जाणून घेऊया?

किमान उत्पन्न किती असावे?- 3 kW क्षमतेचे सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष नाहीत, परंतु 3 kW पेक्षा जास्त आणि 10 kW पर्यंतच्या क्षमतेसाठी कर्ज मिळविण्यासाठी निव्वळ वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

किती कर्ज घेऊ शकता आणि व्याज किती असेल?- 3KW क्षमतेचे सोलर रूफटॉप बसवण्यासाठी तुम्ही 2,00,000 रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता आणि त्याचा व्याज दर वार्षिक 7 टक्के आहे. तर 3KW पेक्षा जास्त आणि 10KW पर्यंतच्या क्षमतेसाठी 6 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते, ज्याचा व्याज दर वार्षिक 10.15% असेल. 65 ते 70 वर्षे वयोगटातील लोकही हे कर्ज घेऊ शकतात. या अंतर्गत कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.