Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 13:35 IST
1 / 10गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना संकटाचा काळ असताना दुसरीकडे इंधनदरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. 2 / 10गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीने पेट्रोल ७.४४ रुपयांनी महागले आहे. तर याच कालावधीत डिझेल ७.५२ रुपयांनी महागले आहे.3 / 10सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत असल्याचे सांगत आहे. तसेच इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 4 / 10क्रूड ऑईलचे दर वर्षभरात २६ डॉलर प्रती बॅरलने वाढले असून, जून २०२० मध्ये ४० डॉलर असलेले दर ७६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. यातच आता १ जुलैला OPEC+ देशांची बैठक होणार आहे. 5 / 10या बैठकीत उत्पादन धोरणावर निर्णय होणार असून, रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे. तसेच या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात.6 / 10महसूल घटल्यामुळे भारत सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता फारच धुसर आहे. त्यामुळे आताच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लीटर १२५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. 7 / 10आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इराणवर अमेरिकेने लादलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत राहतात. 8 / 10शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०३.८९ रुपयांवर कायम असून, दिल्लीत पेट्रोल ९७.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.८८ रुपये भाव आहे. 9 / 10कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९७.६३ रुपये असून, भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०५.९९ रुपये आहे. मुंबईत डिझेलचा दर एका लीटरसाठी ९५.७९ रुपये आहे. 10 / 10तर, चेन्नईत ९२.८९ रुपये आणि कोलकात्यात ९१.१५ रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७ रुपये झाला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी सुरु केलेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही.