आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 20, 2020 08:00 PM2020-09-20T20:00:01+5:302020-09-20T20:17:39+5:30

हळू-हळू 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून कमी होताना दिसत आहेत. याचे मोठे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून एटीएमवरही 2000 रुपयांच्या नोटा कमी प्रमाणावर मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी, 2000 रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने थांबवली असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आता यावर खुद्द सरकारनेच संसदेत स्पष्टीकरण दिले आहे.

अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर लोकसभेत बोलताना म्हणाले, 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात अद्याप सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

लोकसभेत एका लेखी उत्तरात अनुराग ठाकूर म्हणाले, एखाद्या नोटेच्या छपाईसंदर्भातील निर्णय सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) सल्ल्यानंतरच घेत असते.

अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, वित्त वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी कुठल्याही प्रकारचे मागणी पत्र पाठवण्यात आले नाही. मात्र, असे असतानाही, सरकारने नोटांची छपाई बंद करण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही.

ठाकूर म्हणाले, 31 मार्च 2020पर्यंत 2000 रुपयांच्या 27,398 लाख नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या. मार्च 2019पर्यंत 32,910 लाख नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या. तर 2018च्या अखेरपर्यंत 2,000 रुपयांच्या 33,632 लाख नोटा व्यवहारात होत्या.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2019-20च्या वार्षिक अहवालानुसार, मार्च 2018 अखेरपर्यंत 2,000 रुपयांच्या 33,632 लाख नोटा व्यवहारात होत्या. या नोटांची संख्या मार्च 2019 अखेरपर्यंत कमी होऊन 32,910 लाखवर आली. मार्च 2020 अखेरपर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांची संख्या आणखी कमी होऊन 27,398 लाखवर आली आहे.

अहवालानुसार, व्यवहारात असलेल्या एकूण चलनापैकी 2,000 रुपयांच्या नोटांचा भाग मार्च, 2020 अखेरपर्यंत कमी होऊन 2.4 टक्के झाला. मार्च 2019 अखेरपर्यंत हा भाग तीन टक्के, तर मार्च, 2018 अखेरपर्यंत हा भाग 3.3 टक्के होता.

या अहवालानुसार, 2018 पासून तीन वर्षांच्या काळात 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मूल्य आणि प्रमाण दोन्हीचा विचार करता, 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर वाढला आहे.

ठाकूर यांनी आरबीआयचा हवाला देत सांगितले, की कोरोना संकट काळातील लॉकडाउनदरम्यान नोटांची छपाई बंद होती. मात्र, आता केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्सप्रमाणे, प्रिटिंग होत आहे.

कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रातील नाशिक येथील सरकारी छापखान्यातील नोटांची छपाई तीन वेळा थांबवण्यात आली होती.