कोण आहेत जयंती चौहान? ज्यांनी 7 हजार कोटींचा व्यवसाय चालवण्यास नकार दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:48 PM2022-11-28T14:48:40+5:302022-11-28T15:59:02+5:30

Jayanti Chauhan : जवळपास 7,000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या कंपनीच्या जयंती चौहान एकमेव वारस आहेत, परंतु हा व्यवसाय ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

जयंती चौहान यांना जेआरसी नावाने ओळखले जाते. त्यांनी आपल्या एका निर्णयाने संपूर्ण उद्योगाला आश्चर्यचकित केले आहे. जवळपास 7,000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या कंपनीच्या जयंती चौहान एकमेव वारस आहेत, परंतु हा व्यवसाय ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

आता त्यांचे वडील ही कंपनी विकण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आम्ही सांगत आहोत बिसलेरी या सुप्रसिद्ध कंपनीबद्दल जी बाटलीबंद पाणी विकते. जयंती चौहान बिसलेरीचे मालक आणि चेअरमन रमेश चौहान यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात गेले.

जयंती यांनी लॉस एंजेलिसच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंगमधून प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी इस्टिट्यूटो मॅरागोनी मिलानो येथून फॅशन स्टायलिंग आणि लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.

जयंती म्हणजेच जेआरसी यांनी वयाच्या 24 व्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली बिसलेरीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी दिल्ली कार्यालयाचे काम हाताळले आणि कारखान्याच्या नूतनीकरणासह ऑटोमेशनच्या अनेक प्रक्रिया पूर्ण केल्या.

जयंती यांनी नोकरी स्वीकारताच कंपनीतील सर्व बदलांना सुरुवात केली आणि एचआर, सेल्स आणि मार्केटिंगसह अनेक विभागांमध्ये बदल करून एक मजबूत टीम तयार केली. यानंतर, आपल्या क्रॉस कॅटगरी अनुभव आणि जागतिक प्रदर्शनाच्या जोरावर जयंती यांनी 2011 मध्ये मुंबई कार्यालयाचे कामही हाती घेतले.

जयंती चौहान सध्या नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर काम करत आहेत. त्या बिसलरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचरल मिनरल वॉटर आणि फिजी फ्रूट डिंक आणि बिसलेरी हँड प्युरिफायरवर काम करत आहेत. मात्र, त्यांनी संपूर्ण व्यवसाय चालवण्यास नकार दिला आहे.

बिसलेरी ही देशातील बाटलीबंद पाणी विकणारी सर्वात जुनी कंपनी आहे. जयंती यांनी कंपनीचा व्यवसाय सांभाळण्यास नकार दिल्यानंतर कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी अलीकडेच त्यांचा 7 हजार कोटींचा व्यवसाय विकण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी विकण्याबाबत टाटांसह अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे.