भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 11:36 AM2021-08-08T11:36:47+5:302021-08-08T11:42:03+5:30

Amul Franchise: कोरोना संकटाच्या कालावधीतही डेअरी बिझनेस अविरतपणे सुरू होता. यामधील प्रसिद्ध कंपनी Amul व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी देत आहे. पाहा, सर्व डिटेल्स...

कोरोनाच्या संकट कालावधीत अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापारांवर गदा आली. याचा थेट परिणाम रोजगारावर झाला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता मात्र हळूहळू परिस्थिती पूर्ववत होऊन अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना कालावधीतही जी क्षेत्रे अविरत सुरू होती, त्यातील एक प्रमुख क्षेत्र म्हणजे डेअरी आणि डेअरी प्रोडक्ट्स. कोरोना संकट काळातही दुधाचा व्यवसाय अखंडपणे सुरूच होता. डेअरी क्षेत्रातील एक मोठे आणि आघाडीचे नाव म्हणजे Amul.

डेअरी प्रोडक्टमधील प्रसिद्ध कंपनी Amul व्यवसाय करण्याची संधी देत आहे. बिझनेस करण्याच्या विचारात असाल, तर ही सुवर्ण संधी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करून महिन्याला नियमित कमाई करता येऊ शकते, असे सांगितले जाते.

केवळ २ लाखांपासून ते ६ लाखांपर्यंत खर्च करून, व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीलाच चांगला नफा कमवता येऊ शकतो. अमूल कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी ऑफर करीत असल्याचे बोलले जात आहे.

अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी ऑफर करते. एक म्हणजे अमूल आऊटलेट (Amul Outlet) आणि दुसरी म्हणजे अमूल रेल्वे पार्लर (Amul Railway Parlor) किंवा अमूल किओस्कची (Amul Kiosk) फ्रेंचायझी आपण घेऊ शकाल.

यामध्ये सुमारे २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून २५ हजार रुपये, तर रिनोव्हेशन अर्थात नूतनीकरणासाठी एक लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी ७५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अमूल आईस्क्रीम पार्लरची (Amul Ice Cream Parlor) फ्रेंचायझी घ्यायची असेल, तर त्यासाठी काहीशी जास्त गुंतवणूक करावी लागेल. यासाठी ५ लाख रुपयांचे गुंतवावे लागतील. यामध्ये ब्रँड सिक्युरिटी ५० हजार, रिनोव्हेशनसाठी ४ लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी १ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

अमूल आऊटलेट फ्रेंचायझी घ्यायची असेल, तर तुमच्याकडे किमान १५० स्क्वेअर फूट जागा हवी. जर इतकी जागा असेल तर तुम्हाला फ्रेंचायझी मिळू शकते. आयस्क्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी ही अट ३०० स्क्वेअर फूटची आहे. कमी जागा असेल तर तुम्हाला फ्रेंचायझी मिळू शकणार नाही.

अमूलकडून तुम्हाला कंपनीची ओळख दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडिगवर सबसिडी मिळेल. त्याशिवाय सुरुवात करण्यासाठी विशेष मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जातील.

याशिवाय मालक किंवा कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिले जाईल. तुमच्यापर्यंत उत्पादने पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठी शहरे, जिल्ह्याच्या ठिकाणांवर होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हे डीलर्स तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवतील.

फ्रेंचायझीद्वारे दर महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची विक्री होऊ शकते. अमूलचे आऊटलेट सुरू केल्यानंतर कंपनी अमूलच्या उत्पादनावर किमान विक्री किंमत अर्थात MRP वर कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पिशवीवर २.५ टक्के, दूध उत्पादनावर १० टक्के आणि आईस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळू शकेल.

आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रेंचायझीवरही मोठे कमिशन दिले जाते. आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर ५० टक्के कमिशन दिले जाते. प्री पॅक्ड आईस्क्रीमवर २० टक्के, अमूल प्रोडक्टवर १० टक्के असे कमिशनचे गणित आहे.

जर तुम्हाला अमूलची फ्रँचायझी हवी असेल retail@amul.coop यावर मेल करावा लागेल. सर्व तपशील डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्यावी, असे सांगितले जाते.