सोने होणार स्वस्त! ऐन सणासुदीत दर १० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:18 AM2023-10-05T07:18:00+5:302023-10-05T07:23:35+5:30

GOLD: भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशात सोने-चांदी किंवा दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशात सोने-चांदी किंवा दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सातत्याने किमतीत घट होत असलेले सोने पुढच्या काळात आणखी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.

पितृपक्ष उलटल्यानंतर लोक सोने-चांदीची नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यांना आतापासून सोने खरेदीचे प्लॅनिंग करता येईल.

अमेरिकेचा डॉलर गेल्या ११ महिन्यांपासून तेजीमध्ये आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेकडून यापुढेही आणखी काही काळ व्याजदर चढे राहण्याचे संकेत दिले आहेत. याच्या एकूण परिणामाने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत गेले महिनाभर घसरत आहे.

भारतीय सराफा बाजारातही सोन्या-चांदीचे दर कमी होत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार मंदीच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी १० टक्क्यांनी घसरू शकतात. मागील सहा महिन्यांत देशात सोने तब्बल ५,१०० रुपयांनी तर एप्रिलपासून आतापर्यंत चांदीही १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

असे गडगडले धातूंचे दर – सोने ५६,२७१, चांदी- ६५,७९६, शिसे-१८६, अल्युमिनियम-२०८, तांबे-७०५, झिंक-२२४, निकेल-१५९८

९% घट २४ कॅरेट सोन्याच्या दरात झालेली दिसते. ३० एप्रिल रोजी ६१,८९९ रुपयांवर असलेले सोने आता घसरून ५६,२५१ रुपयांवर आले आहे.

१४% घट चांदीच्या दरात झाली. ३० एप्रिल रोजी ७८,०७५ रुपयांवर असलेली चांदी ६५,७९६ रुपयांवर आली आहे.

७५%प्रमाणात डॉलर दोन महिन्यांत जागतिक बाजारातील इतर चलनांच्या तुलनेत महाग झाला आहे.

आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते चीनमध्ये आर्थिक मंदी आल्यास सोन्याचे दर प्रति तोळा ५५,००० रुपयांवर घसरून ५३ हजारांवर येऊ शकतात. चांदीचे दर आणखी घसरून ६०,००० पर्यंत खाली येऊ शकतात.