शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७.५ वर्ष भोग भोगले, शनि आता भाग्योदय करेल; साडेसातीचे चक्र फिरणार, नेमका काय बदल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:31 IST

1 / 15
Sade Sati To Get Changed in March 2025 After Shani Gochar in Meen Rashi: २९ मार्च २०२५ ही तारीख अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. या दिवशी मराठी वर्षाची सांगता होणार आहे. याच दिवशी फाल्गुन महिन्याची अमावास्या आहे. शनिवारी अमावास्या येत असल्याने याला शनि अमावास्या म्हटले जाते. याच दिवशी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. शिवाय याच दिवशी सूर्यग्रहण असणार आहे.
2 / 15
शनि ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साडेसातीचे चक्र बदलणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. या कुंभ राशीत गेले सुमारे अडीच वर्ष विराजमान आहे. आता २९ मार्च २०२५ रोजी शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिचे मीन राशीतील गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले गेले आहे. केवळ कुंडली, राशी नाही, तर देश-दुनियेवर याचा मोठा प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
नवग्रहांमध्ये शनि हा सर्वांत धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत शनि सुमारे अडीच वर्ष विराजमान असतो. त्यामुळे शनिचा प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शनि हा दुःख, दैन्य कारक ग्रह मानला जातो. मकर व कुंभ या दोन राशींचा अधिपती शनि आहे. पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शनिकडे आहे. अंकशास्त्राप्रमाणे ८ या मूलांकाचे स्वामित्व शनिकडे आहे. तूळ ही शनीची उच्च रास असून, मेष ही नीचेची रास आहे.
4 / 15
शनि साडेसाती तर सर्वांनाच परिचित आहे. काही तज्ज्ञांच्या मते शनीला तूळ, मकर, कुंभ व मीन राशी अत्यंत शुभ मानल्या आहेत. शनि हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. साडेसाती योग हा शनिचा विशेष अधिकार आहे. साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा कानावर पडला, तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे, हे समजलं की लगेचच भुवया उंचावतात. एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज, गैरसमज असल्याचे दिसून येते.
5 / 15
साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट हीच संकल्पना रुजलेली दिसते. साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. मात्र, तसे अजिबात नाही. साडेसाती हा संघर्षाचा काळ आहे. साडेसातीच्या काळात अनेकांवर कठीण प्रसंग येत असतात, असे असले तरी याच कालावधीत आपलं कोण आणि परकं कोण, याची नव्याने ओळख होते. स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसे यातून तावून-सुलाखून बाहेर पडतात.
6 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते, ही पहिली अडीच वर्षे होतात. चंद्र राशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरे अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू झाली, असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती म्हणतात. उदा. विद्यमान स्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.
7 / 15
शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे, असे मानले जाते. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया मानली गेली आहे. ज्याच्यामुळे साडेसाती येते, तो शनी ग्रह असला, तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे. शनि हा सूर्यपुत्र मानला जातो. शनी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह आहे. तितकाच ते कर्मप्रदाता आहे. शनि वाईट काहीच करत नाही. उलट, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे देतो.
8 / 15
शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शनी हा शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा आणि कटू सत्य उघड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतील, त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो.
9 / 15
जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना तो उच्च शिखरावर नेऊन बसवतो. साडेसाती हा शनी चंद्राशी निगडीत ग्रहयोग आहे. चंद्र हा मनाचा व भाग्याचा कारक आहे, तर शनी ग्रहमंडळातील न्यायाधीश आहे. शनी हा कर्मकारक आहे. त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्त्वाचा ग्रह आहे. आयुष्यात शुभ अथवा अशुभ होण्यासाठी कर्म हे करावेच लागते.
10 / 15
साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया म्हणावी लागेल. मात्र साडेसातीच्या काळात अशुभ घटना ,भयावह स्थिती, सातत्याने अपयश मिळेल, असा कोणीही अर्थ लावू नये. शनी हे न्यायसत्तेचे प्रतिक आहे. शनी न्यायदानाचे कठोरव्रत निर्लेपपणे आचरणात आणतो. म्हणून जगाचे व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत, असे सांगितले जाते.
11 / 15
२९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीचे चक्र बदलणार आहे. मकर राशीची साडेसाती संपणार आहे. मकर राशीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे ३० मार्च २०२५ रोजीपासून सुरू होणारे हिंदू नववर्ष मकर राशीसाठी नवी पहाट घेऊन येईल, असे म्हटले जात आहे. तर शनि मीन राशीत विराजमान झाल्यानंतर कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे.
12 / 15
शनि मीन राशीत आल्यावर मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राशीचक्रातील पहिली रास असलेल्या मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. काही मान्यतांनुसार, मंगळ ग्रह शनिचा शत्रू ग्रह मानला गेल आहे. तसेच मेष रास ही शनिची नीचेची रास आहे. म्हणजेच या राशीत शनिचा प्रभाव कमी असून, प्रतिकूलता अधिक असू शकणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या साडेसातीचा काळ विशेष ठरू शकणार आहे.
13 / 15
आताच्या घडीला कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, २९ मार्च २०२५ रोजी शनिने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर याचे कोष्टकही बदलणार आहे. कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त होणार आहे. त्यामुळे या दोन्ही राशींना आगामी काळ दिलासादायक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
14 / 15
शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. एकूणच साडेसाती आणि ढिय्या प्रभावाचे चक्र बदलणार असून, ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, सुरू होणार आहे किंवा ढिय्या प्रभावाखाली असणार आहेत, त्यांनी जास्तीत जास्त शनिची उपासना करावी, शनिचे उपाय करावेत, हनुमानाची उपासना करावी, असे सांगितले जाते. तसेच कुंडलीनुसार नेमके काय करता येऊ शकते, याचे मार्गदर्शन योग्य तज्ज्ञ व्यक्तींकडून घ्यावे आणि तसे आचरण करावे, असे सांगितले जात आहे.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक