१५ सेकंदाची Reel बनवणं अन् सौंदर्यावर फेमस होणं, इतकं सोप्प नाही साध्वी बनणं; वाचा नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:39 IST
1 / 15Maha Kumbh Mela 2025: जगातील सर्वांत मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांतीला विविध आखाड्यांच्या साधूसंतांनी त्रिवेणी संगमावर पहिले अमृतस्नान केले. या ठिकाणी तब्बल ३.५० कोटी भाविकांनी स्नान केले. महाकुंभातील सर्वात पहिले पवित्र स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी पार पडले. 2 / 15विविध आखाडे तसेच हिंदू धर्मातील विविध संप्रदायातील लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्यात स्नान केले. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभु पंचायती अटल आखाड्याच्या सदस्यांनी सर्वात पहिल्यांदा अमृतस्नान केले. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. येथे देश-विदेशातील लोक संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत.3 / 15प्रयागराज येथे देशविदेशांतून असंख्य लोक महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधु-संतांच्या अनेक कहाण्याही समोर येत आहेत. यातच महाकुंभमेळ्यात काही वाद होताना पाहायला मिळत आहेत. येथील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे ती उत्तराखंड येथून आलेली साध्वी हर्षा. विशेष म्हणजे, ती या कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र तिच्या साध्वी वेशापेक्षाही, तिचे आणखी एक वेगळे रूपही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 4 / 15प्रयागराज महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानात मॉडेल आणि अँकर हर्षा रिछारियाचा समावेश करून तिला महामंडलेश्वरच्या शाहीरथावर बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाकुंभात अशी परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विकृत मानसिकतेचे परिणाम आहे. महाकुंभात रंगरुप, चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर मनाचे, हृदयाचे सौंदर्य दिसायला हवे होते. अद्याप संन्यास घ्यायचा की, विवाह करायचा, हे ठरलेले नाही, अशा व्यक्तीला संत आणि ऋषींच्या शाहीरथावर स्थान देणे योग्य नाही. सनातन धर्माबाबत समर्पण असणे आवश्यक आहे, असे शंकराचार्य म्हणाले.5 / 15साध्वी हर्षाने नुकताच दावा केला होता की, ती महामंडलेश्वर यांची शिष्या असून दोन वर्षांपूर्वी ग्लॅमरस जीवन सोडून पूर्णपणे सनातन संस्कृतीकडे वळली आहे. मात्र, तिचा गेल्या एक वर्षापूर्वीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन वर्षांपूर्वीच ग्लॅमरस जग सोडून सनातन संस्कृती स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या हर्षाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.6 / 15साध्वी हर्षा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर १३ जानेवारी रोजी त्यांचे ६६७K फॉलोअर्स होते. त्यानंतर एका दिवसांत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली. त्यांचे फॉलोअर्स १ मिलियनपर्यंत पोहोचले. 7 / 15हर्षा रिछारियाचा महाकुंभामध्ये स्थावरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. या व्हिडीओमध्ये हर्षाने अगदी साध्वीप्रमाणे कपडे घातले आहेत. मात्र जुने फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर तिच्यावर प्रचंड टीका होत आहे. 8 / 15यानंतर हर्षाने समोर येत स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली की मी साध्वी नाही. साध्वी बनण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही धार्मिक संस्कार किंवा दीक्षा तिने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, गुरुदीक्षा आणि मंत्रदीक्षा घेतली आहे. परंतु, साध्वी होणे बिलकूल सोपी गोष्ट नाही. साध्वी होण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि खडतर असते. साध्वी होण्यासाठी नेमके काय करणे अपेक्षित असते, याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. जाणून घेऊया...9 / 15साध्वी होण्यासाठी एका महिलेला खूप कठीण प्रक्रियेतून जावे लागते. साध्वी होण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. साध्वी होण्यापूर्वी, महिलेचे कुटुंब आणि तिची कुंडली देखील तपासली जाते.10 / 15साध्वीला हे सिद्ध करावे लागते की, तिचा आता तिच्या कुटुंबाशी आणि समाजाशी कोणताही संबंध नाही. त्यांना त्यांची ओढ सोडावी लागेल. मोह सोडून द्यावा लागेल. साध्वीला आयुष्यभर भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो आणि मांसाहारापासून दूर राहावे लागते.11 / 15साध्वीला आयुष्यभर केशरी वस्त्रे रंगाचे कपडे परिधान करावी लागतात. साध्वी बनण्याच्या प्रक्रियेपूर्वी काही ठिकाणी मुंडन करायला सांगितले जाऊ शकते. शुद्धीकरणासाठी, एखाद्या पवित्र नदीत किमान १०० वेळा डुबकी मारायला लावली जाऊ शकते. 12 / 15साध्वी होण्यासाठी सर्वप्रथम गुरुची आवश्यकता असते. गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतरच साध्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. गुरुदीक्षामध्ये गुरु आपल्या शिष्याला केवळ मंत्रच देत नाहीत तर ज्ञानही देतात.13 / 15गुरुदीक्षा घेतल्यानंतर, सांसारिक जीवनातील आसक्ती सोडून द्यावी लागते आणि शास्त्रांचे ज्ञान मिळविण्यासाठी धार्मिक पुस्तकांकडे वाटचाल करावी लागते.14 / 15एकदा एखाद्याला गुरुसेवा मिळाली की, त्याला त्याच्या गुरुची सेवा करावी लागते आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करावे लागते.15 / 15- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.