Laxmi Pujan 2024: महालक्ष्मीचे घरात आगमन हवे असेल तर ताबडतोब घराबाहेर काढा 'या' पाच गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 14:46 IST
1 / 6आध्यात्मात तुकोबांनी सांगितले आहे, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' अर्थात पैसा कमवावा तो सन्मार्गाने. जर चुकीच्या मार्गाने पैसा कमावला असेल तर लक्ष्मी रुष्ट होते आणि तिथून निघण्याचा मार्ग स्वतःच शोधून काढते. अचानक घरात येणारे आजारपण, दुर्धर रोग, चोरी, लूटमार, अपघात, कलह यामुळे पैशांना पाय फुटतात आणि लक्ष्मी घराबाहेर जाते. याशिवाय एक कारण म्हणजे पसारा आणि अडगळ! दिवाळी आधी तो आपण घराबाहेर काढला नाही तर दाराशी आलेली लक्ष्मी दाराबाहेरूनच परत जाईल. त्यासाठी पुढे दिलेल्या वास्तू टिप्स ताबडतोब अंमलात आणा. 2 / 6आपण सगळे जण निर्गुण भगवंताच्या सगुण रूपाची अर्थात देवाच्या मूर्तीची पूजा करतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर ती केवळ दगडाची, धातूची न राहता आपल्यासाठी ती सजीव मूर्ती होते. अशातच मूर्ती भग्न झाली तर आपल्या मनात देवाचा कोप होईल वगैरे भीती निर्माण होते. वास्तविक पाहता तसे होत नाही, परंतु देवाची भग्न मूर्ती दिसायलाही योग्य वाटत नाही, म्हणून वेळीच ती वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. मातीची असेल तर पाण्यात विरघळून झुडुपात टाकावी. पण घरात ठेवू नये. 3 / 6नवीन फोन वरचेवर घेणे सुरु झाल्यापासून प्रत्येकाच्या घरात बऱ्यापैकी इ-कचरा गोळा होत आहे. त्यात भर पडते ती बंद पडलेली घड्याळं, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची! आज आवरू, उद्या भंगारला देऊ म्हणत घरात ती अडगळ साठत राहते आणि त्यामुळे राहू दोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम वास्तू तथा व्यक्तीवर होतो. म्हणून बंद पडलेल्या वस्तू वेळीच घराबाहेर काढून टाका. 4 / 6आरशाचा उपयोग आपण प्रतिबिंब पाहण्यासाठी करतो. आरसा फुटला असेल तर आपली प्रतिमा आपल्याला खंडित दिसेल आणि ते दृष्य आपल्याला समाधानकारक वाटणार नाही. वास्तू शास्त्रानुसार अशा फुटलेल्या आरशात लक्ष्मीने पाहिले तर तिची भग्न प्रतिमा पाहून ती निघून जाईल आणि तिच्या जागी अलक्ष्मी घरात वास करील. 5 / 6तुटलेले फर्निचर देखील अडगळीचाच एक भाग असतो. जे वापरता येत नाही आणि जुन्या आठवणी म्हणत घराबाहेर टाकल्याही जात नाहीत. वस्तूंशी आपले भावनिक नाते असते, आठवणी असतात हे जरी मान्य केले तरी त्यामुळे घरात फक्त पसारा होतो आणि त्यामुळे नकारात्मक लहरी निर्माण होतो. अशा ठिकाणी लक्ष्मी मुक्काम करत नाही. आयुष्यातले स्थैर्य कायम ठेवायचे असेल तर तुटलेले फर्निचर काढून टाका. 6 / 6पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घराचा कोपरा लोखंडी अवजारांनी भरलेला असायचा. पण त्या अवजारांना वेळोवेळी तेलपाणी केले जात असे. मात्र आता अवजारांचा फारसा वापर होत नसल्याने त्यांना गंज चढतो. शिवाय इतर लोखंडी वस्तूही ठेवून ठेवून गंजून जातात. मात्र या वस्तू काळानुकाळ ठेवल्याने शनी दोष निर्माण होतो आणि वास्तू दोषाची शक्यता निर्माण होते. म्हणून या वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात आणि सुखाचा मार्ग मोकळा करावा.