मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:27 IST
1 / 15MNS Raj Thackeray And Lucky Number 9 Numerology: महाराष्ट्रात सध्या महानगरपालिकांची धामधूम सुरू आहे. युती-आघाडी यांच्या चर्चेच गुऱ्हाळ सुरू आहे. नवनवीन समीकरणे पाहायला मिळत आहे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणूक कोणतीही असो काही राजकारणी लोक नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यापैकी एक नाव म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे.2 / 15शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्सल तालमीत तयार झालेल्या राज ठाकरे यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात काकांसोबत केली. त्यानंतर झालेला राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास सर्वांच्याच समोर आहे. अगदी प्रत्यक्ष देवावर किंवा दैवावर विश्वास नसला तरी अनेक जण कोणती ना कोणती गोष्ट लकी तरी मानत असतो. 3 / 15राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायचे झाले, तर ९ अंकाच्या भोवती त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य फिरताना पाहायला मिळते. वाहनाचा क्रमांक असो, शिवसेना सोडणे असो, मनसे पक्ष स्थापन करणे असो किंवा अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी अधिकृत युती जाहीर करणे असो. यातील बहुतांश गोष्टी या ९ आकड्याशीच संबंधित दिसतात. 4 / 15विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आहे, त्या तारखेची बेरीज केली, तरी ती ९ येते. त्यामुळे आतापर्यंत ९ या आकड्यावर विश्वास ठेवणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंशी केलेली युती आणि निकालाच्या तारखेची येणारी ९ ही बेरीज फळणार का, मनसे पक्षाचे नवनिर्माण होणार का, हा सगळा योगायोग राज ठाकरेंसाठी मंगलकारक, भाग्योदय करणारा ठरेल का, याविषयी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.5 / 15एकपासून नऊपर्यंत या अंकापैकी नऊ हा अंक सर्वश्रेष्ठ मानला जातो. ९ अंकाचा पाढा आणि त्यातील सगळ्याची बेरीज ९ अशीच येते. नऊ हा अंक पूर्णपणे निर्विकार आहे. ही संख्या पूर्ण संख्या असून तिला ब्रह्मसंख्या म्हणतात. हिंदू संस्कृतीत नऊ तत्त्वांना महत्त्व आहे. आपल्याग्रह मालिकेत नऊ ग्रह आहेत. रत्ने पण नऊ प्रकारची सांगितली गेली आहेत. नवरात्रीत देवीच्या नऊ अवतारांचे वर्णन केल्या जाते. चार युगांच्या वर्षांची बेरीजही ९ अशीच येते. योगशास्त्राप्रमाणे मानवी शरीराला नऊद्वारे असल्याचे सांगितले गेले आहे. नाट्यशास्त्रात किंवा साहित्यात नऊ प्रकारच्या भावनांचे वर्णन आहे. नवविधा भक्तीही सांगितली गेली आहे. 6 / 15ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असणाऱ्या अंकशास्त्राचा विचार केल्यास, या शास्त्रातही १ ते ९ या अंकांचाच विचार केला जातो. यातील ९ अंकाचा स्वामी मंगळ सांगितला गेला आहे. मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती मानले गेले आहे. मंगळाचा सर्वसाधारण स्वभाव धाडसी, कुणाचे न मानणारा, हेकेखोर, स्वतंत्र वृत्तीचा, हट्टी व महत्त्वाकांक्षी असा आहे. तेज, राष्ट्रहित, धैर्य, सहनशक्ती, दुःख निवारण, आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्त्व, शास्त्रीय विषयांचे शोध, पुढारीपणा हे मंगळाचे गुणधर्म मानले गेले आहेत. 7 / 15मंगळाचे अनेक गुणधर्म हे राज ठाकरे यांच्यातही पाहायला मिळू शकातात. राज ठाकरे स्वत:साठी ९ हा अंक लकी मानतात. अंकशास्त्रानुसार महत्त्वाच्या निर्णयांचा या अंकाशी संबंध असेल, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. राज ठाकरे यांच्या आडनावचे स्पेलिंग THACKERAY असे लिहिले जाते. या सर्वाची बेरीज ९ येते. राज ठाकरे यांच्या सर्व वाहनांचे क्रमांक ९ ने संपतो किंवा त्याची बेरीज ९ येते. 8 / 15राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा २७ नोव्हेंबर २००५ रोजी केली होती. यातील तारखेची बेरीज २+७=९ अशी येते. महिना व वर्षाची बेरीज म्हणजेच १+१+२+०+०+५ = ९ हे कनेक्शन उघड आहे. शिवसेना सोडल्यानंतर राज यांनी पहिली सभा १८ डिसेंबर २००५ रोजी घेतली होती. यातील केवळ तारखेची बेरीज ९ येते. 9 / 15राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना ९ मार्च २००६ रोजी केली. पक्षाच्या पहिल्या सभेसाठी राज यांनी ९ चाच मुहूर्त निवडला. तसेच १८ मार्च २००६ रोजी एक सभा घेतली होती. यातील केवळ तारखेची बेरीज ९ येते. उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी ९ या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.10 / 15अनेकदा विधानसभा निवडणुकीत प्रचाराची सुरुवातही ९ तारखेपासून किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ९ शी संबंधित असलेल्या जसे की, १८ आणि २७ यांसारख्या तारखांना केल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरेंनी ९ फेब्रुवारी रोजी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा आयोजित केला होता.11 / 15केवळ राजकीय नाही तर वैयक्तिक आयुष्यातही राज ठाकरे यांनी ९ तारखेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाहाची तारीख २७ जानेवारी होती. २+७=९. तसेच विवाह मुहूर्त १२ वाजून ५१ मिनिटांचा होता. यामध्येही १+२+५+१=९ असे ९ अंकांचे कनेक्शन दिसून येते. 12 / 15मूळ एकसंध शिवसेना आणि भाजपा युतीवेळी ९ आकड्यासाठी जागा वाटपात शिवसेनेला ३ अधिक जागा देऊ केल्या होत्या. सुरुवातीला १६८-१२० च्या फॉर्म्युल्या एकमत झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत यात बदल करण्यात आला. यानंतर हा फॉर्म्युला १७१-११७ असा करण्यात आला होता. जो बाळासाहेब ठाकरेंनी मान्य केला होता.13 / 15अगदी अलीकडे आताही १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेली ही दिलजमाई आता मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीतही कायम असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ज्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधूंनी अधिकृत युती जाहीर केली, त्या दिवशीही ९ अंकाचा योग साधण्यात आला. राज ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. २४ डिसेंबर २०२५ याची संपूर्ण बेरीज केली, तर २+४+१+२+२+०+२+५ = ९ अशी येते. 14 / 15विशेष म्हणजे मुंबईसह सर्वच महापालिकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागणार आहेत. या तारखेची संपूर्ण बेरीज केली, तर १+६+०+१+२+०+२+६ = ९ अशी येते. त्यामुळे ९ अंकाची किमया पुन्हा एकदा मनसे आणि राज ठाकरेंना साथ देणार का, मंगळाचे स्वामित्व असलेला ९ अंक भाग्यकारक ठरणार का, याकडे देशाचे, राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 15 / 15- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.