भौम प्रदोष म्हणजे काय? महादेव व हनुमानाचे पूजन पुण्यफलदायक; पाहा, सोपी पद्धत

By देवेश फडके | Published: January 25, 2021 09:56 PM2021-01-25T21:56:41+5:302021-01-25T22:02:10+5:30

प्रत्येक मराठी महिन्यात एकादशी, चतुर्थी येतात, तसेच प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोष वेळेस हे व्रत केले जाते, म्हणून यास प्रदोष व्रत असे म्हणतात. ज्या वारी प्रदोष असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे. भौमप्रदोष म्हणजे काय? हे व्रत कसे आचरावे? भौमप्रदोष व्रताचे महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घ्या...

आपल्याकडे प्रत्येक महिन्यातील व्रत-वैकल्ये ठरलेली असतात. जसे प्रत्येक मराठी महिन्यात एकादशी, चतुर्थी येतात, तसेच प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोष वेळेस हे व्रत केले जाते, म्हणून यास प्रदोष व्रत असे म्हणतात. ज्या वारी प्रदोष असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी भौमप्रदोष आहे.

दिवसानुसार येणाऱ्या प्रदोषाची नावे व त्याचेही महत्त्व अगदी वेगवेगळे असल्याचे शास्त्रांत सांगितले गेले आहे. प्रदोष व्रत प्रामुख्याने करून महादेव शिवशंकरांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेले महादेवांचे पूजन, आराधना उपासना अत्यंत शुभ मानली जाते.

एखाद्या मराठी महिन्याची शुद्ध किंवा वद्य त्रयोदशी मंगळवारी आल्यास त्याला भौमप्रदोष म्हटले जाते. मंगळवारी प्रदोष व्रताचे आचरण करून सायंकाळी केलेले शिवपूजन शुभ मानले जाते. तसेच महादेव शिवशंकरांसह हनुमंतांचे पूजन करणेही शुभलाभदायक मानले जाते. २६ जानेवारी २०२१ रोजी भौमप्रदोष असून, भौमप्रदोष म्हणजे काय? हे व्रत कसे आचरावे? भौमप्रदोष व्रताचे महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घ्या...

सूर्यास्तानंतर स्नानादी कार्ये उरकून प्रदोष व्रताचरणाचा संकल्प करावा. यानंतर शिवपूजन करावे. शिवपूजनावेळी बेल, धोत्रा या पानांचा आवर्जुन वापर करावा. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. शंकराची आरती करावी आणि या व्रताची कहाणी ऐकावी वा त्याचे पठण करावे, असे सांगितले जाते.

महादेवांसह हनुमानाची पूजा करणेही उत्तम मानले जाते. प्रदोष व्रतात हनुमानाला लाल फुले आवर्जुन अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास सुंदरकाण्ड आणि हनुमानाष्टक स्तोत्राचे ११ वेळ पठण करावे.

भौमप्रदोषाचे व्रत मंगळ ग्रहाच्या वक्री प्रभावाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठीही आचरले जाते. ज्या व्यक्तींच्या जन्म कुंडलीतील मंगळ कमकुवत आहे, त्या व्यक्तींनी हे भौमप्रदोष व्रत करावे. असे केल्यास कुंडलीतील मंगळ मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच मंगळाचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते.

शिवभक्तांसाठी प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या प्रदोष व्रतामुळे एक सहस्र यज्ञाचे पुण्य लाभते. आर्थिक आघाडी उत्तम होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय व्रताचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना दीर्घायुष्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.