शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० वर्षांचा संघर्ष, ५००० कोटींचे दान, ३ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; पाहा, सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:01 IST

1 / 15
अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, २२ जानेवारी २०२४ रोजी ते झाले. अयोध्येतील भव्य राम मंदिर बांधून एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात अनेक गोष्टी घडल्या. कोट्यवधी रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले. तर कोट्यवधी भाविकांनी राम मंदिरात दान दिले.
2 / 15
राम मंदिर व्हावे, यासाठी धार्मिक संघर्ष, न्यायालयीन लढाई आणि लाखो लोकांनी विविध प्रकारचा त्याग केला. तर, अनेक जण राम मंदिर व्हावे एवढीच इच्छा ठेवून व्रतस्थ जीवन जगले. उत्तर प्रदेशातीलअयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले.
3 / 15
प्रभू श्रीराम आणि रामनामाच्या मोहिनीचे गारूड आजही कायम असल्याचे सांगितले जाते. मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांच्या आचरणाचे, नीतिमत्तेचे, शौर्याचे, धैर्याचे आजच्या काळातही दाखले दिले जातात. रामनाम आणि श्रीरामांचे चरित्र केवळ एक आदर्श नसून, त्यातील शिकवण ही कालातीत अशीच आहे. सर्वोत्तम, सर्वार्थाने श्रेष्ठ सेवक हनुमंतांपासून ते समर्थ रामदास स्वामी, तुलसीदास यांसारखे अनेक संत-सज्जन रामनामावर तरले. खुद्द वाल्मिकींनीही रामनामाचा अखंड जप केला होता, असे सांगितले जाते. रामनाम केवळ रामायण किंवा त्यानंतरच्या कालखंडापुरते मर्यादित नाही. तर रामनाम परब्रह्म, अनंताचे नाम असून, चिरकालाचे असल्याचे सांगितले जाते.
4 / 15
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी केले. या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी ५ लाखांहून अधिक भाविकांची अभूतपूर्व गर्दी जमली. रामललाच्या औपचारिक प्राणप्रतिष्ठा हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा क्षण होता. राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.
5 / 15
१ जानेवारी २०२५ रोजी या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात भाविकांचा जनसागर लोटला होता. ५ लाखांहून अधिक भाविक रीमदर्शन घेण्यासाठी आले होते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची संख्या वाढू लागली. ३१ डिसेंबरपर्यंत २ लाखांहून अधिक भाविक आले होते. तर १ जानेवारी रोजी ३ लाख अतिरिक्त भाविक आले.
6 / 15
२२ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन झाल्यानंतर राम मंदिरात अवघ्या बारा दिवसांत २४ लाख भाविक अयोध्येत आले होते. २०२४ मध्ये अयोध्याउत्तर प्रदेशातील सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण बनले. जिथे १३५.५ दशलक्ष देशांतर्गत पर्यटक आणि हजारो आंतरराष्ट्रीय पर्यटक आले.
7 / 15
३० ऑक्टोबर २०२४ रोजी अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यादरम्यान २,५१२,५८५ दिवे लावून एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित करण्यात आला. हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण नव्याने बांधलेल्या भव्य राम मंदिरात रासाजरा होणारा हा पहिला दीपोत्सव होता. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी झालेल्या भव्य आरतीवेळी १,१२१ सहभागींनी एकाच वेळी दिवे ओवाळत आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. दीपोत्सव महोत्सवाचाच हा एक भाग होता.
8 / 15
या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीराम आणि माता-पित्यांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. श्रीरामांसह माता सीता आणि लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या प्रतिमाही स्थापित केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हे या सर्वांची रचना करणार असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 15
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधला जाणार आहे. राम दरबाराची कलाकृती बनवण्याचे काम सुरू आहे. याच मंदिरात रामचरितमानसकार गोस्वामी तुलसीदास यांची मूर्तीही स्थापन केली जाणार आहे. तसेच राम दरबारात प्रभूंच्या लीलांचे दर्शन भाविकांना घडवण्यात येईल. तसेच राम मंदिर परिसरात अन्य अनेक मंदिरे बांधली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
10 / 15
रामलल्ला मंदिरात विराजमान होऊन एक वर्ष झाले आहे. अशा परिस्थितीत, या एका वर्षात राम मंदिरात किती दान झाले आहे आणि सर्वात जास्त कोणी दान केले आहे, यासंदर्भात काही आकडेवारी देण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मिळालेल्या दानांची माहिती दिली होती. राम मंदिराच्या दानपेटीत ५५.१२ कोटी रुपयांचे दान जमा झाले होते. पण, आतापर्यंत राम मंदिराला ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची देणगी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
11 / 15
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १८ कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी दान दिले आहे.
12 / 15
कथाकार मोरारी बापूंनी ११.३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे आतापर्यंतची सर्वाधिक दान असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि युके येथे राहणाऱ्या मोरारी बापूंच्या विविध अनुयायांनी एकत्रितपणे ८ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले जात आहे.
13 / 15
हिरे कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक गोविंदभाई ढोलकिया यांनी ११ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दुसरीकडे दररोज दर्शन घेणासाठी आलेल्या भाविकांकडून कोट्यवधींचे दान हे मंदिराच्या दान पेटीत टाकले जात आहे.
14 / 15
केवळ भारतातून नाही तर जगातील अनेक देशांमधून राम मंदिरासाठी दान, देणगी देण्यात आली आहे. आतापर्यंत राम मंदिराला परदेशातून ११ कोटी रुपयांचे देणगी मिळाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये राम मंदिराला परदेशातून देणग्या स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार, राम मंदिरासाठी सर्वाधिक देणग्या नेपाळ आणि अमेरिकेतून मिळाल्या आहेत.
15 / 15
उत्तर प्रदेशात महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सुमारे ४० कोटी जण येतील, असा दावा केला जात आहे. तर यापैकी सुमारे ३ ते ५ कोटी भाविक, पर्यटक राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतात, असा कयास बांधला जात असून, त्या दृष्टीने राम मंदिर प्रशासनातर्फे तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशspiritualअध्यात्मिक