August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:38 IST
1 / 13ऑगस्टमध्ये राज राजेश्वर योगाचा शुभ संयोग होणार आहे. सूर्य आपल्या सिंह राशीत संक्रमण करेल, तर चंद्रही या महिन्यात कर्क राशीत संक्रमण करेल, चंद्र सूर्यापासून बाराव्या घरात येईल, ज्यामुळे महिन्याच्या मध्यात राज राजेश्वर योग तयार होईल. त्याचदरम्यान आदित्य योग देखील तयार होणार आहे. ज्यामुळे सहा राशीच्या लोकांचे आयुष्य उजळून निघणार आहे आणि बाकी राशींना ऑगस्ट कसा जाणार, तेही पाहू. 2 / 13मेष : या महिन्यात तुमची सर्जनशीलता वाढेल. तसेच, नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील. गुंतवणूक तसेच वाहन खरेदीचे योग येतील. कौटुंबिक प्रेमाने भारावून जाल. खाण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. या काळात महादेवाची उपासना विशेष फळ देईल. 3 / 13वृषभ : हा महिना तुम्हाला थोडाफार काळजीत टाकणारा ठरेल. सगळे प्रश्न एकत्र आल्याने भांबावून जाल. नोकरी, आर्थिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्नांनी ग्रासून गेल्यामुळे शरीराबरोबर मन थकल्यासारखे वाटेल. अशा वेळी मित्रांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अध्यात्मिक ऊर्जा ताकद देईल, त्यामुळे उपासना वाढवा आणि आवश्यक तिथे मौन पाळा. 4 / 13मिथुन : या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अर्थार्जनाच्या नवीन संधी चालून येतील. उत्पन्नात वाढ होईल, पण आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील सदस्य, तसेच जोडीदाराच्या तक्रारी शांतपणे हाताळा, अन्यथा नात्यात दरी निर्माण होऊ शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गणेश उपासना किंवा आराध्य दैवताचे नामस्मरण लाभ देईल. 5 / 13कर्क : या महिन्यात तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील. नोकरीत कोणाशीही वाद वाढवू नका. काही बाबतीत माघार घेणे इष्ट ठरेल. नवीन संधी खुणावतील, पण विचारपूर्वक आणि सल्लामसलत करून निर्णय घ्या. या काळात गुंतवणूक तुम्हाला लाभ देईल. जोडीदाराचे सहकार्य, घरच्यांचा पाठिंबा यामुळे मन शांत राहील. इष्ट देवतेची पूजा आणि नामस्मरण करत राहा. 6 / 13सिंह : हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आणि तुमच्या नेतृत्व कौशल्यांना उजाळा देणारा ठरेल. लोकप्रियता वाढेल. उत्पन्नाचे साधन वाढेल, आर्थिक बाजू सक्षम होईल. गुंतवणूक लाभदायी ठरेल. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ येईल. आरोग्य सांभाळा, बाहेरचे खाणे टाळा. येत्या काळात तीर्थयात्रेचे किंवा सहलीचे आयोजन कराल. महादेवाची उपासना लाभदायी ठरेल. तसेच दानधर्म केल्याने अडलेले प्रश्न सुटतील. 7 / 13कन्या : या महिन्यात तुम्हाला सगळ्याच बाबतीत सावध पवित्रा घ्यावा लागेल. नोकरी बदल करण्याचा विचार तूर्तास टाळा. खर्च आणि आर्थिक व्यवहाराचे गणित बसवा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. कौटुंबिक वाद, आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील, ज्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. ध्यानधारणा, योगाभ्यास आणि नामस्मरण ही त्रिसूत्री लक्षात ठेवा, लाभ होईल. उमापार्वतीची उपासना करा. 8 / 13तूळ : हा महिना तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुमची नवीन ओळख तयार होईल. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभामुळे चैनीचे आयुष्य जगाल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी खूप चांगला ठरेल. कुटुंबात आनंदाचे क्षण मिळतील, ज्यामुळे जगण्याची उमेद वाढेल, उत्साह वाढेल. नेहमीची कामे दुप्पट वेगाने करू शकाल. 9 / 13वृश्चिक : या महिन्यात जबाबदाऱ्या वाढतील पण कष्टाचे गोड फळ चाखता येईल. चांगली गुंतवणूक लाभ देईल. वाहन खरेदीचा विचार तूर्तास पुढे ढकला. जोडीदाराचे मत घ्या. नवीन कामाची सुरुवात उत्साह, जोम आणि यश देईल. अति कामामुळे थकवा जाणवेल, पुरेशी विश्रांती घ्या. कुटुंबात आनंदाचे क्षण आल्यामुळे समाधान मिळेल. देवी उपासना लाभ देईल. 10 / 13धनु : हा महिना तुमच्यासाठी प्रवास योग घेऊन येईल. पगार वाढ तसेच पदोन्नती होईल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि अध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी उपासना, ध्यानधारणा करा. मन जेवढे शांत ठेवाल तेवढी प्रगती होईल. 11 / 13मकर : हा महिना करिअरमध्ये चढ उतार आणणारा ठरेल. परंतु, तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल. गुंतवणुकीत यश मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. बोलणे सौम्य ठेवले तर वादाचे प्रसंग टाळता येतील. शक्य तिथे मौन पाळा, प्रश्न आपोआप सुटतील. इष्ट देवतेची उपासना लाभदायी ठरेल. आर्थिक बाबतीत स्थिरता ठेवणे हे ध्येय ठेवा. 12 / 13कुंभ : या महिन्यात तुम्हाला नातेसंबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. घरी तसेच नोकरीच्या ठिकाणी जपून व्यवहार आणि संभाषण करा. नोकरीच्या नवीन संधी येतील. पगार वाढीचे योग आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. एखाद्या प्रश्नामुळे मन थोडे अस्वस्थ होईल पण ध्यानधारणा तसेच नामस्मरणामुळे अडचणीतून मार्ग मिळेल. 13 / 13मीन : हा महिना कामाचा ताण वाढवणारा ठरेल. अनावश्यक खर्च वाढतील. पैशांचे नियोजन आवश्यक ठरेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मात्र योग्य प्रमाणात विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन उत्तम साथ देईल. येत्या काळात आर्थिक वाढ होण्याचे चिन्ह आहे. त्यासाठी आवश्यक परिश्रम करण्याची तयारी ठेवा. शिव मंदिरात तसेच शनी मंदिरात रोज गेल्यास लाभ होईल.