1 / 12राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना अश्रू अनावर झाले. हर तऱ्हेने शरद पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अद्याप तरी शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.2 / 12शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केले. मात्र, यानंतर विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस द्यावेत, असा निरोप शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना पाठवण्यात आला. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांनी समजवल्यानंतर कार्यकर्ते शांत झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असू शकेल, यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 3 / 12राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवारांचा हा निर्णय देशातील राजकीय वातावरण ढवळून काढणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर याचा प्रभाव पडू शकतो, असे कयास बांधले जात आहेत. मात्र, यातच शरद पवार यांची कुंडली काय सांगते? आपल्या राजकीय चालींनी तसेच निर्णयांनी लोकांपुढे तारे चमकवणाऱ्या शरद पवार यांच्या कुंडलीतील ग्रह कसे आहेत? कुंडलीतील राजयोग, ग्रहांची दशा पाहता शरद पवारांची आगामी काळातील दिशा काय असू शकेल? 4 / 12१२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे शरद पवार यांचा जन्म झाला. शरद पवार यांची कुंडली वृश्चिक लग्न राशीची आहे. महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले आणि केंद्रात कृषी आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळलेल्या शरद पवार यांनी २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या राजकीय डावपेचांचा पराभव करून महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामील होऊन सर्व राजकीय पंडितांना आश्चर्यचकित केले आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. 5 / 12शरद पवार यांच्या कुंडलीत सूर्य आणि बुधाचा अद्भूत असा बुधादित्य राजयोग असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच राजकीय कारकीर्द, क्लृप्या, राजकीय युक्त्या यांमध्ये मुरलेले आणि मातब्बर राजकारणी म्हणून शरद पवार यांची ओळख दृढ होण्यास मदत झाल्याचे म्हटले जात आहे. एक अनुभवी दिग्गज राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.6 / 12पण जन्मकुंडलीत वादाचे स्थान आणि रोगाचे स्थान म्हणजे षष्ठ स्थानी शनि-गुरु-चंद्र यांच्या संयोगाने त्यांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागला, असे म्हटले जात आहे. याशिवाय, राजकारणातही मोठे चढ-उतार पाहावे लागले. शरद पवार यांनी ५० वर्षे भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कधीच पूर्ण करता आला नाही. तसेच पंतप्रधान होण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही.7 / 12शरद पवार यांच्या कुंडलीतील कुंडलीच्या बाराव्या स्थानी असलेला शुक्र आणि मंगळ यांच्यावर सहाव्या स्थानी असलेल्या गुरु, चंद्र, शनी यांची दृष्टी पडत आहे. विद्यमान सद्यस्थितीत शरद पवार यांच्या कुंडलीत बुधाच्या महादशामध्ये शुक्राची अंतर्दशा सुरू आहे. जुलै २०२२ ते मे २०२५ या कालावधीत ही अंतर्दशा सुरू राहणार आहे. अष्टमेश बुधाच्या महादशामध्ये १२ व्या स्थानाच्या शुक्रची अंतर्दशा यांमुळे शरद पवार आगामी काळात राजकारणातून निवृत्ती होऊ शकतात, असे संकेत असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 12वाढते वयोमान आणि आरोग्याच्या समस्या यांमुळे शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे. शरद पवार यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचे संकेत दिले होते आणि आता यानंतर ही घोषणा केली गेली आहे. याचा संबंध जोडला जात आहे. 9 / 12परंतु, शरद पवार यांच्या कुंडलीत सध्या अंतर्दशानाथ शुक्र नवांश कुंडलीनुसार स्वराशीत वृषभेत आहे. याच कारणामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडले असले तरी राजकारणातील चाणक्य खेळी ते कायम ठेवतील, असे म्हटले जात आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षांची युती २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्पष्ट आकार घेऊ शकते. 10 / 12जैमिनी ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून शरद पवार यांच्या कुंडलीत मकर राशीच्या चरदशा सुरू असून, मकर राशीतून दशम भावात विराजमान अमात्यकार शुक्र आणि मातृक मंगळ यांची उपस्थिती त्यांना राजकारणात काम करण्यास आणखी प्रवृत्त करून प्रोत्साहन देत राहू शकेल. एक वरिष्ठ सल्लागार म्हणून राजकीय कारकीर्दीत काही काळ काम करण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 11 / 12राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यान चार नावं घेतली जात आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.12 / 12सदर कयास, शक्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.