अधिक मास: सकाळी उठल्यावर ‘या’ ५ गोष्टी करा, लक्ष्मी कृपा करेल; मालामाल अन् चिंतामुक्त व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 03:03 PM2023-07-22T15:03:03+5:302023-07-22T15:03:03+5:30

Adhik Maas 2023: अधिक मासात लक्ष्मीदेवीची कृपा, शुभाशिर्वाद लाभावेत, यासाठी काय करावे? जाणून घ्या...

समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमे॥ भारतीय प्राचीन परंपरामध्ये संस्कृती, संस्कार यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यातही अधिक मासात केलेली उपासना, नामस्मरण, आराधना, पूजन, जप विशेष पुण्यफलदायी मानले जाते. सुमारे ३ वर्षांतून एकदा अधिक मास येतो. सन २०२३ मध्ये चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास आला आहे.

श्रावण महिन्यांत व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते. प्रत्येक दिवसाचे व्रत आणि त्याचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष आहे. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. जो तो आपापले कुळधर्म, कुळाचार, आराध्य देवता यांप्रमाणे विविध देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण करत असतो.

सर्व देवतांमध्ये लक्ष्मी देवीला विशेष महत्त्व आहे. धन-धान्य, सुख-समृद्धी, पैसा-अडका, वैभव लक्ष्मी देवीच्या कृपेने प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता आहे. लक्ष्मी देवीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपण अनेकविध ग्रंथात विषद करण्यात आले आहे.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत अनेक गोष्टी समाविष्ट होत असतात. मात्र, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काही गोष्टी केल्यास त्याचा शुभ लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जाते.

खरे तर, शास्त्रानुसार पहाटेची ब्राह्ममुहुर्ताची वेळ शुभ मानली जाते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते. त्याच्या आयुष्यातून दुर्दैव दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते, असे मानले जाते.

धार्मिक शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. असे केल्याने व्यक्तीचे नशीब पालटते. तसेच त्याचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो, असे सांगितले जाते.

धार्मिक शास्त्रांनुसार, एखाद्या व्यक्तीने सकाळी हात जोडून लक्ष्मीची देवीची प्रार्थना करावी, असे म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची देवीचा प्रभावी मंत्र म्हणताना तळहाताकडे पाहावे, असे सांगितले जाते. तो मंत्र म्हणजे, “कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्, प्रभाते कर दर्शनम्।।”

रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचे भांडे वापरावे. कारण तांब्याचा धातू सूर्यदेवाशी संबंधित आहे. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकते. सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते.

शक्य असेल दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

तसेच दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. ज्या लोकांवर त्यांचे माता-पिता प्रसन्न असतात, त्यांच्यावर सर्व देवी-देवताही प्रसन्न होतात. तसेच, आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने, सूर्य आणि गुरू देखील कुंडलीत सकारात्मक असतात, असे सांगितले जाते.

अधिक मासात दररोज तुळशीची पूजा करावी. तुळस पूजनावेळी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये पवित्रता आणि सुख-समृद्धीचा योग निर्माण होतो. श्रीहरी आणि देवी लक्ष्मी यांचे अपार आशिर्वाद प्राप्त होऊ शकतात.

याशिवाय अधिक मासात लक्ष्मी देवीचे मंत्र, स्तोत्र पठण, नामस्मरण, श्लोक पठण, कथा श्रवण केल्यास शुभ-लाभ मिळू शकतो. तिन्हीसांजेला केलेले लक्ष्मी पूजन पुण्य-फलदायी मानले जाते, असे सांगितले जाते.