शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रीराम मंदिर वर्षपूर्ती: वर्षभरात कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; किती दान मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:22 IST

1 / 15
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिर सर्वांसाठी खुले झाले आणि केवळ देशात नाही, तर जगात जल्लौष झाला. राजस, सुकुमार अशा रामललाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी एकच गर्दी केली. राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी उसळलेल्या जनसागराला एक वर्ष झाले तरी ओहोटी लागलेली नाही. अगदी पहिल्या दिवसांपासून सुमारे सरासरी एक लाख भाविक रामाचे दर्शन घेत असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 15
सन २०२५ मध्ये शनिवार, ११ जानेवारी रोजी तिथीनुसार राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना झाल्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. राम मंदिराचे संपूर्ण काम अद्याप झालेले नाही. या वर्षांत राम मंदिर आणि परिसरातील संपूर्ण काम पूर्ण होऊ शकेल, असा दावा श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.
3 / 15
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीराम आणि माता-पित्यांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. श्रीरामांसह माता सीता आणि लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या प्रतिमाही स्थापित केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हे या सर्वांची रचना करणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 15
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार बांधला जाणार आहे. राम दरबाराची कलाकृती बनवण्याचे काम सुरू आहे. याच मंदिरात रामचरितमानसकार गोस्वामी तुलसीदास यांची मूर्तीही स्थापन केली जाणार आहे. तसेच राम दरबारात प्रभूंच्या लीलांचे दर्शन भाविकांना घडवण्यात येईल. तसेच राम मंदिर परिसरात अन्य अनेक मंदिरे बांधली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 15
राम नामाचा महिमा अगाध आहे. राम दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली आहे. केवळ भारत नाही, तर जगभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या ८ महिन्यात तब्बल अडीच कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. तर २०२५च्या पहिल्या दिवशी अयोध्येत सुमारे १० लाख भाविक दाखल झाले होते. पैकी सव्वा दोन लाख भाविकांनी रामाचे दर्शन घेतले, अशी माहिती दिली जात आहे.
6 / 15
उत्तर प्रदेशात महाकुंभाचे आयोजन केले जात आहे. या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सुमारे २५ कोटी जण येतील, असा दावा केला जात आहे. तर यापैकी सुमारे ३ कोटी भाविक, पर्यटक राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतात, असा कयास बांधला जात असून, त्या दृष्टीने राम मंदिर प्रशासनातर्फे तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
7 / 15
राम मंदिर दानाच्या बाबतीतही वेगाने पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, राम मंदिरात महिन्याला किमान एक कोटी रुपयांचे दान भाविकांकडून केले जात आहे. सोने-चांदी यांचेही दान मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. अगदी अल्पावधीतच अयोध्येतील राम मंदिर देशातील सर्वांत श्रीमंत टॉप-१० मंदिरांच्या यादीत समाविष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.
8 / 15
१० वर्षांत ६ कोटी मंत्रांनी सिद्ध केलेल्या श्रीरामयंत्रावर राम मंदिर उभे राहिल्याचे सांगितले जात आहे. नवे भव्य राम मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर या मंदिरात वर्षभरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. राम नवमीचा उत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच दिवाळीसह अन्य अनेक सण-उत्सव राम मंदिरात साजरे करण्यात आले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापासून ते प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज राम चरणी नतमस्तक झाले. अनेकांनी आपली सेवा रामचरणी अर्पण केली.
9 / 15
तसेच राम मंदिराला सूर्यतिलक करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिरात १.५ क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस अर्पण करण्यात आले. आतापर्यंत राम मंदिर प्रशासनाने रामभक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. तसेच भाविकांना राम मंदिरात अतिशय सुलभपणे रामललाचे दर्शन व्हावे, यासाठीही विविध गोष्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून राबवल्या जात आहेत.
10 / 15
अयोध्येतील राम मंदिराबाहेर परिसरात रामललाचे फोटो, लॉकेट्स, प्रसाद तसेच पूजा साहित्य विकणारे, चंदनाचा टिळा लावणारे यांच्या कमाईत गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. याची प्रातिनिधिक स्वरुपातील आकडेवारी समोर आली आहे.
11 / 15
गेल्या वर्षभरात राम मंदिर परिसरात मोठे फेरबदल पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिर परिसरातील अन्य बांधकामांना वेग आला आहे. पर्यटकांची वाढतच जात असलेली संख्या, राम मंदिराची भव्यता पाहण्याची उत्सुकता आणि रामलला दर्शनाची भाविकांची आतुरता यांमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राम मंदिर परिसरात तसेच लगतच्या भागात धार्मिक साहित्याची विक्री करणाऱ्यांच्या कमाईत कैक पटीने वाढ झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
12 / 15
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयोध्येतील राम मंदिराबाहेर परिसरात रामललाचे फोटो, लॉकेट्स, प्रसाद तसेच पूजा साहित्य विकणारे, चंदनाचा टिळा लावणारे यांच्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. रामललाचे फोटो विकून एका विक्रेत्याने गेल्या वर्षभरात तब्बल ५ लाख रुपयांची कमाई केली आहे. तर, पूजा साहित्याची विक्री करणाऱ्यांची कमाई दिवसाला ३०० ते ४०० रुपयांवरून थेट अडीच हजार रुपयांपेक्षाही जास्त होत असल्याचे सांगितले जाते.
13 / 15
राम मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांच्या भाळी चंदनाचा टिळा लावणारे दिवसाला किमान ५०० ते कमाल हजारो रुपये कमावतात. तसेच ज्या भाविकांना चालायला त्रास होतो, अशांसाठी दिल्या जाणाऱ्या व्हीलचेअरची सेवा प्रदान करणारे दिवसाला किमान १५०० रुपयांची कमाई सहज करतात. याशिवाय राम मंदिर परिसरात प्रसाद म्हणून विविध गोष्टींची विक्री करणारे किमान १५०० ते कमाल ४ हजार रुपयांपर्यंतची कमाई करतात, असा दावा करणारी काही आकडेवारी समोर येत आहे.
14 / 15
राम मंदिर परिसरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची दुकाने, चणे-दाणे, मक्याचे प्रकार, पोहे, तंदुरी चहा असे पारंपरिक आणि ट्रेंडिंग खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांची कमाईही दिवसाला काही हजार रुपये होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
15 / 15
आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तसेच अयोध्या धाम पाहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिकच वाढत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. श्रीराम जय राम जय जय राम...!!!
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशtourismपर्यटनspiritualअध्यात्मिक