मस्तच! आता घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; 'ही' आहे अतिशय सोपी पद्धत

By देवेश फडके | Published: January 19, 2021 05:11 PM2021-01-19T17:11:05+5:302021-01-19T17:16:02+5:30

कोरोनामुळे नानाविध रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच बसून तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. कसे? जाणून घ्या...

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे सुमारे आठ महिने देश ठप्प झाला होता. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. पुन्हा असे दिवस पाहायला लागू नयेत, असेच सर्वांना वाटत आहे. मात्र, आता हळूहळू देशाची गाडा पुढे सरकताना दिसत आहे. कोरोना काळात अनेकांची नानाविध कामे खोळंबली होती. आता ही कामे करण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत.

अनेक ठिकाणी रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू न झाल्याने रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. अशातच तुमच्या वाहन परवान्याचा मुदत कालावधी संपला असेल, तर प्रादेशिक वाहतूक कार्यालयात खेटे घालण्याशिवाय पर्याय राहत नाही.

पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जायला लागायचे. आता मात्र वाहन परवान्याचे नुतनीकरण करायचे असेल, तर आरटीओ कार्यालयात जायची गरज नाही. कारण ऑनलाइन पद्धतीने अगदी घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.

कोरोनाचा धोका आणि वाढती गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करून भरावा लागेल. त्यानंतर मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. जर तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म १ए आवश्यक असणार आहे.

सदर कागदपत्रांसह जुने ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोही अपलोड करावा लागणार आहे. यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच पूर्ण करता येणार आहेत.

ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर parivahan.gov.in/parivahan/ जा. इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.

यानंतर 'सर्व्हिसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस' यावर क्लिक करा आणि पुढील दिलेली आवश्यक माहिती भरा. अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे भरल्यानंतर ऑनलाइन प्रोसेस पूर्ण होते.

यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल. या काही सोप्या स्टेप्सचा वापर करून अगदी कुठेही न जाता तुम्हाला घरात बसून ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करता येऊ शकेल.