सावधान...! पुराच्या पाण्यात कार अडकलीय? या गोष्टी मुळीच करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:47 PM2019-08-08T18:47:12+5:302019-08-08T18:51:15+5:30

राज्याला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. मुंबईत महिन्याभरात दोनदा तर सिंधूदूर्ग रत्नागिरीसह पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात भयाण पूरस्थिती उद्भवली आहे. यामध्ये घरादारात पाणी घुसले आहे. तसेच लाखमोलाची वाहनेही पाण्यात बुडाली आहेत. ही वाहने पुन्हा दुरुस्त करण्यासाठी मोठा फटका बसणार आहे. मात्र, पुराच्या पाण्यात गाडी असल्यास या चुका टाळा तर फटका कमी बसेल.

जर पुराचे पाणी डॅशबोर्ड पर्यंत आले असल्यास कारचे बहुतांश इलेक्ट्रीक पार्ट खराब होतात. जर हेच पाणी बंपरपर्यंत असेल तर मोठे पार्ट खराब होण्याची शक्यता कमी असते.

गाडी पाण्यात गेल्यास त्या गाडीचे नुकसान प्रकारावर ठरते. जर बेस मॉडेल असेल तर कमी इलेक्ट्रीक पार्ट असल्याने नुकसानही कमी असते. तर पेट्रोल कारपेक्षा डिझेलच्या कारचे नुकसान कमी होते. याचप्रमाणे गाडीचे वयोमानही नुकसान ठरविते.

इन्शुरन्स कंपनी मुद्दामहून केलेले नुकसान भरपाई करत नाही. एखाद्याने समोर रस्त्यावर पाणी वाहताना दिसत असूनसुद्धा त्यातून कार नेली आणि पाणी गेल्यास कंपन्या क्लेम नाकारतात.

कार पाण्यात गेल्यानंतर पाणी ओसरल्यावर आधी कारचे बॉनेट उघडावे. कारची बॅटरी डिस्कनेक्ट करावी. लगेचच स्टार्ट मारू नये.

पेट्रोल कार असल्यास एअर फिल्टर, प्लग आणि फ्युअल टँक साफ करावे. तर डिझेल कार असल्यास फ्युअल टँक, डिझेल फिल्टर साफ करावे.

पाणी ओसरताच कार पहिल्यांदा टो करावी. कारण कार सुरु केल्यास इलेक्ट्रीक पार्ट खराब होऊ शकतात. यामुळे शक्यतो कार जागेवरूनच टो करून न्यावी. अन्यथा कारचे पार्ट पुन्हा वापरात आणणे कठीण असते. याचबरोबर कार साफ करण्याचाही प्रयत्न करू नये.

अशावेळी इन्शुरन्स खूप महत्वाचा असतो. गाडी थेट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये न्यावी. त्यानंतर इन्शुरन्सद्वारे कंपनी क्लेम करत दुरुस्ती किंवा कार डॅमेज झाली असल्यास नुकसानभरपाई मिळवून देते.