जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाला ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST2021-05-10T04:17:00+5:302021-05-10T04:17:00+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून, गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत आहे. या रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी जम्बो ...

जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाला ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून, गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत आहे. या रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जात आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजनही मागविले जात आहे; परंतु, राज्यात निर्माण झालेला ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेता रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती.
येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प मंजूर झाला असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच दरम्यान या रुग्णालयासाठी ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन शनिवारी उपलब्ध झाल्या. रुग्णालयात यापूर्वी ३० मशीन उपलब्ध आहेत. त्यामुळे ७० रुग्णांसाठी त्वरित ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. रुग्णालय प्रशासनाने ४० रुग्णांना या मशीनच्या साहाय्याने ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. मशीन उपलब्ध झाल्यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी घटणार आहे.
१४८ रुग्णांना दिले जाते ऑक्सिजन
जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात सद्य:स्थितीला १४८ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. तसेच सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ज्या रुग्णांना प्रतिमिनिट ५ ते १० लिटरपर्यंत ऑक्सिजनची आवश्यकता भासते, असे रुग्ण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनवर शिफ्ट करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद रुग्णालयाला शनिवारी प्राप्त झालेल्या ४० मशीन्स अद्ययावत स्वरूपाच्या असून, एका मशीनवर दोन रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सुविधा आहे.