निधीअभावी स्त्री रुग्णालयाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:02+5:302021-04-24T04:17:02+5:30
परभणी: शहरातील दर्गा रोड परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या स्त्री रुग्णालयाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाकडून १४ ...

निधीअभावी स्त्री रुग्णालयाचे काम ठप्प
परभणी: शहरातील दर्गा रोड परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या स्त्री रुग्णालयाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाकडून १४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र त्यातील केवळ ८ कोटी रुपयांचा निधी अदा करण्यात आला आहे. यातील ४ कोटी रुपयांचा निधी अडकल्याने या रुग्णालयाचे काम ठप्प पडले आहे.
परभणी येथील स्त्री रुग्णालय निजामकालीन इमारतीत सुरू आहे. त्यामुळे ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील स्त्री रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील मोकळ्या जागेत १४ कोटी रुपये मंजूर करून स्त्री रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले, मात्र राज्य शासनाकडून आतापर्यंत आठ कोटी रुपयांचा निधी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहे. उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने उपलब्ध झालेल्या निधीतून स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे ७० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र उर्वरित इलेक्ट्रिक कामासह नळ योजना आदी कामे बाकी आहेत. त्यामुळे रुग्णांना निजामकालीन इमारतीमध्ये सद्यस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन मंजूर झालेला निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर या इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करून सुसज्ज असे १०० खाटांचे रुग्णालय नवीन इमारतीत सुरू करावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.