पावसाळ्याच्या तोंडावर कामांचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:38+5:302021-06-10T04:13:38+5:30
शहरात मागील तीन दिवसांपूर्वी ३१ कोटींच्या विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले. यामध्ये ११५ कामे नागरी दलित वस्ती ...

पावसाळ्याच्या तोंडावर कामांचा सपाटा
शहरात मागील तीन दिवसांपूर्वी ३१ कोटींच्या विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले. यामध्ये ११५ कामे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून तर ५२ कामे दलितोत्तर योजनेंतर्गत होणार आहेत. ही कामे शहरातील सर्व प्रभागात त्या-त्या नगरसेवकांनी सुचविल्याप्रमाणे होणार आहेत. यात रस्ता मजबूतीकरण, नाली बांधकाम, पेव्हर ब्लाॅक, सिमेंट रस्ता, हाॅटमिक्स आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, सर्व कामे करताना पावसाळ्याचा कालावधी डोळ्यासमोर ठेवत विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. मात्र, पहिल्याच पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी गुडघाभर पाणी खड्ड्यात जमा झाले. यामुळे वाहतुकीचे रस्ते बंद झाले. असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक ६ मधील दादाराव प्लाॅट ते संभाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्याबाबत घडला. दोन दिवसांपूर्वी हा रस्ता खोदला आणि त्यात पावसाचे पाणी जमा झाले. यामुळे येथील वाहतूक बुधवारी दिवसभर ठप्प होती. याच प्रभागात चर्मकार गल्ली, लहूजी नगर येथेही नव्याने होणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले आहे. इथून पुढे चार महिने पावसाळा लक्षात घेता महापालिकेने कामे करताना पर्यायी रस्ता करून नागरिकांची गैरसोय टाळणे गरजेचे आहे.
मोकळ्या मैदानाला तळ्याचे स्वरूप
दादाराव प्लाॅट भागातील एका मोकळ्या मैदानाला बुधवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. यातच येथे लहान मुलांचे खेळणीचे साहित्य दाखल झाले आहे. यामुळे येथे चिमुकल्यांची खेळणीसाठी गर्दी होत आहे. मैदानातील पाणी काढणे गरजेचे असल्याचे काही नागरिकांचे म्हणने आहे. या पाण्यामुळे लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.
शहरातील कोणती कामे सुरू झाली आणि कोणती नाही, याची माहिती घेऊन सांगतो. संभाजीनगरचे काम याच योजनेतील आहे.
- वसीम पठाण, शहर अभियंता, मनपा