लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वुमेन वारियर्स ऑन ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:01+5:302021-06-03T04:14:01+5:30
परभणी जिल्हा पोलीस दलावर मागील पंधरा महिन्यांपासून कोरोनामुळे बंदोबस्ताचा ताण आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना दिवस-रात्र नेमून ...

लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत वुमेन वारियर्स ऑन ड्युटी
परभणी जिल्हा पोलीस दलावर मागील पंधरा महिन्यांपासून कोरोनामुळे बंदोबस्ताचा ताण आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना दिवस-रात्र नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यरत रहावे लागते. यात महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी याही कमी नाहीत. त्यांनाही घर आणि नोकरी या दोन्ही बाजू सांभाळून काम करावे लागत आहे. परभणी पोलीस दलात १६६७ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये १४४१ पुरुष कर्मचारी, २२६ महिला कर्मचारी तर १२२ पुरुष अधिकारी, दहा महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी काही महिलांना पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वायरलेस विभाग, सीसीटीएनएस आणि जिल्हा विशेष शाखा यासह बंदोबस्ताचे काम करावे लागते.
एकूण पोलीस अधिकारी १२२
महिला पोलीस अधिकारी १०
एकूण पोलीस १६६७
महिला पोलीस २२६
कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच
शहरासह जिल्ह्यात १९ पोलीस ठाणी आहेत. तर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विविध विभाग आहेत. ज्यात काही ठिकाणी महिला पोलीस अधिकारी यांना नेमणूक दिली जाते. तसेच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचारी यांना रात्रीची ड्युटी लागल्यास त्यांना घरातील ज्येष्ठ आणि लहान मुले यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून मग नोकरीवर जावे लागते. अशा वेळी कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यास किंवा संवाद साधण्यास मोबाईलचाच वापर करावा लागतो. लहान मुलांना मोबाईलवरून एखादी गोष्ट सांगून त्यांची समजूत काढावी लागते.
माझी नेमणूक नानलपेठ पोलीस ठाणे येथे आहे. मला मागील पाच वर्षांपासून एक दिवसआड रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पोलीस ठाण्यात सीसीटीएनएसच्या कामासाठी नेमणूक आहे. मला दोन वर्षांची मुलगी आहे. रात्रीच्या वेळी तिचे जेवण, झोप व सांभाळ करण्यासाठी माझी बहीण घरी आली आहे. रात्रीच्या वेळी मुलीला कधी माझी आठवण आल्यास मी तिच्याशी मोबाईलवरून बोलते. - उर्मिला कोंडीबा पारवे.
घरातील ज्येष्ठ आणि लहान मुले यांची सर्व जबाबदारी पार पाडून पोलीस ठाण्यात यावे लागते. मी साधारण पाच वर्षांपासून वायरलेस विभागासाठी नानलपेठ पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे. आठवड्यातून तीन दिवस किमान रात्रीची ड्युटी करावी लागते. एक मुलगा व एक मुलगी माझ्याविना रात्री वडील, आत्या यांच्यासोबत राहतात. - मिनाक्षी मुलगीर.
आई आणि बाबा दोघेही पोलीस आहेत. त्यांच्या नोकरीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. कधी कधी आई रात्री ड्युटीला जाते. अशा वेळी मी माझ्या ४ वर्षांच्या लहान भावाला सांभाळतो. बाबा घरी असतात तरी मला आणि लहान भावाला घरात आईची जेवण करताना कमतरता भासते. - अभिनव राजेश आगाशे.
माझी आई नानलपेठ पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे. तिला अनेकदा रात्रीची ड्युटी असते. अशावेळी मी माझ्या आजीसोबत आणि बाबांसोबत रात्रीचे जेवण करतो आणि आजीसोबत झोपतो. सकाळी उठल्यावर आई घरी आली की मग दिवसभर आईशी मनसोक्त गप्पा मारतो. तसेच अभ्यास करतो. - विरेन मुरकुटे.
माझी आई पोलीस असल्याने तिच्या ड्युटीच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे घरची कामे करून स्वत:ची करमणूक करावी लागते. माझा भाऊ आणि मी दोघे वडिलांच्या सोबत आई नसताना वेळ घालवतो. कोरोनामुळे आई घरी असावी, असे वाटते. पण ते शक्य नाही. - अनुष्का कोरे.