एकजुटीने महिलांनी केली दारूबंदी
By Admin | Updated: December 5, 2014 15:18 IST2014-12-05T15:18:58+5:302014-12-05T15:18:58+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत गावामध्ये फुकटात वाटण्यात आलेल्या दारूने बिघडलेल्या काही ग्रामस्थांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविले.

एकजुटीने महिलांनी केली दारूबंदी
परभणी : निवडणुकीच्या रणधुमाळीत गावामध्ये फुकटात वाटण्यात आलेल्या दारूने बिघडलेल्या काही ग्रामस्थांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविले. गांधीगिरीच्या पद्धतीतून केलेल्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि परभणी तालुक्यातील बाभळी गावामध्ये बुधवारपासून दारूबंदी सुरू झाली. यासाठी महिला बचत गटांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.
परभणीपासून २0 कि. मी. अंतरावर असलेल्या बाभळी या गावाची जवळपास १२00 लोकसंख्या आहे. या गावात पूर्वी मोठय़ा प्रमाणात अवैधदारूची विक्री होत होती. परिणामी दारू पिणार्यांची संख्या वाढली. त्याचा गावातील महिलांना त्रासही सुरू झाला. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी २00७ मध्ये येथील महिला एकत्र आल्या. संघर्षानंतर गावात दारूबंदी झाली. तब्बल सात वर्ष गावामधील ही स्थिती कायम राहिली आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावामध्ये मतांसाठी काही राजकीय नेत्यांनी फुटकात दारू वाटली. परिणामी 'मुफ्त का चंदन, घिस मे नंदन' या म्हणीप्रमाणे अनेकांनी पेगवर पेग भरले. दारूची चटक लागली. परिणामी पुन्हा गावामध्ये दारू विक्री सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांपासून दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाल्याने गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी दारू विक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. गावामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत येणारे सहा बचत कार्यरत आहेत. या महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी मन्सूर पटेल, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे, सहयोगिनी सुरेखा खाडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील आकांक्षा लोकसंचलित साधन केर्ंद्राच्या संचालिका पार्वतीबाई पांढरे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार दारू विक्री करणार्या व्यक्तीच्या घरी जाऊन बचत गटातील ७२ महिलांपैकी १0 महिला दररोज दारू विक्री बंद करण्याची विनंती करीत असत. त्यानंतर तेथेच ठिय्या मारत असत. जवळपास २0 दिवसांपासून हा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी सदरील दारू विक्रेत्याने कंटाळून शेवटचा बॉक्स विकू द्या, अशी या महिलांना विनंती केली. महिलांनी नेहमीप्रमाणे गांधीगिरीच्या माध्यमातून ठिय्या मांडला.
परिणामी दारू पिण्यासाठी येणारे व्यक्तीही परत गेले. त्यामुळे विक्रेत्याचेही मनपरिवर्तन झाले आणि त्याने बुधवारपासून गावामध्ये दारू विक्री करणार नाही, असे त्या महिलांना सांगितले, तशी खात्रीही करून दिली. त्यामुळे बुधवार वगुरूवार असे दोन्ही दिवस गावामध्ये दारूची विक्री झाली नाही. गावातील बचत गटाच्या महिलांच्या एकजुटीमुळेच गावामध्ये दारूबंदी शक्य झाली असल्याचे पार्वतीबाई पांढरे यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)
■ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणार्या बाभळी गावातील सहा महिला बचत गटांच्या सदस्यांनी घेतला पुढाकार
> सात वर्षापूर्वी दारुबंदी झालेल्या गावात काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी गावामध्ये वाटण्यात आली होती, मोफत दारू.
> त्यानंतर गावामध्ये दोन महिन्यांपासून अवैध दारू विक्री सुरू असल्याने महिला झाल्या होत्या त्रस्त.
> अन्य गावातील महिलांनी आदर्श घेण्याची गरज.