शिक्षकांचाच पगार उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:30+5:302021-05-15T04:16:30+5:30
परभणी : कोरोनाच्या संकटात इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत असताना शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ...

शिक्षकांचाच पगार उशिरा का?
परभणी : कोरोनाच्या संकटात इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत असताना शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र पगारासाठी वाट पहावी लागत आहे. शासनाने एप्रिल महिन्याचा पगार अजूनही जमा केला नसल्याने शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत ४८३ शिक्षक आहेत. या शिक्षकांचा एप्रिल महिन्यापासून पगार न झाल्याने शिक्षक व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासन निर्देशाला ‘खो’
जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेलाच करावा, या संबंधी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे आदेश असतानाही स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आदेशाला ‘खो’ दिला आहे. त्यामुळेच दर महिन्याच्या १ तारेखला पगार न होता शिक्षकांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार?
मागील महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व या महिन्यात रमजान ईदसारखे महत्त्वाचे सण असतानाही शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षकांचा पगार वेळेवर व्हावा, या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे विनंती केली आहे.
ज्ञानेश्वर लोंढे, शिक्षक
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शिक्षकांना स्वत: व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रुग्णालयात उपचार घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी पैशाची आवश्यकता असते. मात्र, पगार वेळेवर मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ तारखेला पगार होणे गरजेचे आहे.
ज्ञानोबा देवकते, मुख्याध्यापक
दर महिन्याला उशिरा होणाऱ्या पगारामुळे गृह कर्जाचे हप्ते लांबत असून, बँक खाते एनपीएमध्ये जात आहेत. या संकटाच्या काळात दवाखान्याचा खर्चही वाढला आहे. शिवाय, उशिरा होणाऱ्या पगारामुळे मानसिकता बदलत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत लक्ष देऊन शिक्षकांचा पगार वेळेत करणे गरजेचे आहे.
सूर्यनारायण रासवे, शिक्षक