दहा रेल्वेस्थानकावरील धूळ कधी झटकणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:03+5:302021-09-02T04:39:03+5:30
परभणी जंक्शनला जोडणाऱ्या गंगाखेड, परळी, मानवत रोड, सेलू व पूर्णा, नांदेड या मार्गावर जवळपास १० छोटे रेल्वेस्टेशन आहेत. जेथे ...

दहा रेल्वेस्थानकावरील धूळ कधी झटकणार ?
परभणी जंक्शनला जोडणाऱ्या गंगाखेड, परळी, मानवत रोड, सेलू व पूर्णा, नांदेड या मार्गावर जवळपास १० छोटे रेल्वेस्टेशन आहेत. जेथे केवळ पॅसेंजर रेल्वेला थांबा आहे. कोरोनापूर्वी या ठिकाणी दिवसभरात ८ ते १० पॅसेंजर रेल्वेची ये-जा होती. सध्या केवळ २ ते ३ रेल्वे सुरू आहेत. त्याही अवेळी असल्याने त्यांचा ग्रामीण भागातील प्रवाशांना तालुक्याचे व जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी फायद्याच्या नाहीत. यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातील प्रवासी करीत आहेत.
बंद असलेली रेल्वे स्थानके
- पिंगळी, मिरखेल, चुडावा
- पेडगाव, देवलगाव अवचार, ढेंगळी पिंपळगाव
- सिंगणापूर, पोखर्णी, धोंडी, वडगाव
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
पूर्णा-हैदराबाद
औरंगाबाद-हैदराबाद
काचिगुडा-मनमाड
नांदेड-नगरसोल
नांदेड-दौंड
निजामाबाद-पंढरपूर
निजामाबाद-पुणे
परळी-अकोला
एक्स्प्रेस सुरु मग पॅसेंजर बंद का ?
ग्रामीण भागातून दररोज शेकडो प्रवासी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी भाजी तसेच दूध, दही यासह अन्य साहित्य घेऊन विक्रीसाठी जातात; मात्र मागील दीड वर्षापासून दररोज स्वतःच्या वाहनाने किंवा बसने जाण्याची वेळ येत आहे. रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. - विलास ठेंग, पेडगाव.
दररोज जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी जावे लागते. मात्र, ऑटो व खासगी वाहनाने जाण्यासाठी दिवसाला ४० रुपये लागत आहेत. याऐवजी पॅसेंजर रेल्वे सुरू केल्यास १०० ते १५० रुपये महिन्याचा पास काढून ये-जा करता येते. यामुळे रेल्वेने जाणे सोपे आहे. पॅसेंजर रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. - केशव पाटील, मिरखेल.
ग्रामीण स्थानकावर अन्य कामे सुरु
मालगाडी असो की एक्स्प्रेस रेल्वे यांची क्राॅसिंग या छोट्या स्थानकांवर अनेकदा होते. यामुळे स्थानकावर कायमस्वरुपी कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच गँगमन व अन्य कर्मचारी दुरुस्ती आणि पाहणीसाठी कार्यरत असतात. केवळ पॅसेंजरची तिकीट विक्री बंद आहे. - अरविंद इंगोले, स्टेशन प्रबंधक, परभणी.