जिल्ह्यातील एसटीची चाके पुन्हा थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST2021-06-29T04:13:36+5:302021-06-29T04:13:36+5:30

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्याचा समावेश पुन्हा तिसऱ्या स्तरात झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा ...

The wheels of the ST in the district stopped again | जिल्ह्यातील एसटीची चाके पुन्हा थांबली

जिल्ह्यातील एसटीची चाके पुन्हा थांबली

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्याचा समावेश पुन्हा तिसऱ्या स्तरात झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे दररोज होणाऱ्या २०० बसफेऱ्या ठप्प पडल्या असून, यातून महामंडळाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दोन आठवड्यांपूर्वी सर्व व्यवहार पूर्ववत झाले होते. एस. टी. महामंडळाची बससेवाही सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली. मात्र राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यस्तरावरून सर्वच ठिकाणी तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील एस. टी. बसवाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यात एकही बस धावली नाही. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील बसही जिल्ह्यात दाखल झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागातून परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात मिळून दररोेज २५० फेऱ्या होतात. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील २०० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यात जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरील बसफेऱ्यांचा समावेश आहे. अचानक बससेवा ठप्प झाल्याने सोमवारी दिवसभरात सुमारे २० लाख रुपयांचे महामंडळाच्या परभणी विभागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, इतर जिल्ह्यांचाही तिसऱ्या स्तरात समावेश असताना त्या ठिकाणी एस. टी. बससेवा सुरू आहे. मात्र परभणी जिल्ह्यात ही सेवा बंद केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांची वाढली गैरसोय

सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे बाहेर जिल्ह्यातूनही बसेस जिल्ह्यात धावल्या नाहीत. त्यामुळे प्रवासाचा बेत आखलेल्या प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली.

बसस्थानके पुन्हा ओस

सोमवारपासून बससेवा बंद राहिल्याने बसस्थानके ओस पडली होती. दोन आठवड्यापर्यंत जिल्ह्यात बसस्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढत होती. मात्र सोमवारी ही सेवा बंद केल्याने बसस्थानके प्रवाशांविना ओस पडल्याचे दिसून आले.

Web Title: The wheels of the ST in the district stopped again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.