दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:59+5:302021-07-24T04:12:59+5:30
कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न होताच शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या सूत्रानुसार जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्केंच्या ...

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात !
कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न होताच शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या सूत्रानुसार जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्केंच्या आसपास लागला आहे. निकालानंतर आता शाळांमधून दाखला काढण्यासाठी विद्यार्थी व पालक शाळेत दाखल होत आहेत; परंतु या दाखल्यावर शेरा काय लिहावा, यावरून मुख्याध्यापक संभ्रमात सापडले आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून काही सूचना येतात का? याची त्यांना प्रतीक्षा लागली आहे. तर काही मुख्याध्यापकांनी गतवर्षीप्रमाणेच दाखल्यावर शेरा लिहून विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
मुख्याध्यापक म्हणतात...
दाखल्यावर काय शेरा लिहायचा असा प्रश्न होता; पण नुकतेच विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाले आहेत. या गुणपत्रकात परीक्षा क्रमांक व एप्रिल २०२१ असा उल्लेख आहे. त्याचीच नोंद करावी लागेल.
- राजेश तलवारे, कुपटा
विद्यार्थ्याच्या मूळ गुणपत्रिका अद्याप प्राप्त व्हायच्या आहेत. विद्यार्थ्याच्या दाखल्यावर गुणपत्रकावरील महिना व वर्ष टाकुन परिक्षा क्रमांकानुसार एस.एस.सी उत्तीर्ण असे लिहता येईल.
- रमेश नखाते, वालूर
पालक म्हणतात...
दहावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे शाळेतून ज्या पद्धतीने दाखल मिळणार आहे, त्यानुसार दाखल घेऊन पुढील वर्गात मुलाचा प्रवेश घेणार आहे. प्रवेशासाठी सध्या कसलीही घाई नाही.
- शंकर काळे, परभणी
मुलाचा दहावीचा चांगला निकाल लागला आहे. दाखला अजून शाळेतून काढला नाही; परंतु मुख्याध्यापक व शाळांनी याबाबत काय तो निर्णय घेऊन योग्य तो दाखल द्यावा.
- सुनील कापसे, परभणी
दाखलवर शेरा लिहिण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा संभ्रम नाही. नियमितपणे मुध्याध्यापक जो शेरा लिहितात, तोच शेरा लिहायचा आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा लिहिण्याबाबत नव्याने कुठल्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही. मुख्याध्यापकांच्या स्तरावरील हा विषय आहे.
- विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी, परभणी