हद्दपारीचा उपयोग काय ? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:33+5:302021-09-11T04:19:33+5:30
परभणी शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. परभणी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. ...

हद्दपारीचा उपयोग काय ? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच
परभणी शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. परभणी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. यातच जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत होणाऱ्या किरकोळ गुन्हेगारीच्या घटनावगळता टोळीकडूनही मोठे गुन्हे केले जातात. अशा टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांकडून हद्दपार करण्याचा अहवाल तयार केला जातो. यात तीन ते चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे करणारे गुन्हेगार असल्यास त्यांना पोलीस ठाण्याची हद्द किंवा जेथे या गुन्हेगारांचा धोका होऊ शकतो तेथून हद्दपार केले जाते. परभणी पोलीस अशा कारवाई दरवर्षी करत असते.
हद्दपारीच्या कारवाया
मागील १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा हद्दपार करण्याचा प्रस्ताव बनविला. त्यात ऑगस्ट अखेरपर्यंत १६ जणांना हद्दपार केले आहे.
हद्दपारीनंतर जिल्ह्यात फिरणाऱ्यांचा तपास गरजेचा
एकदा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर ठराविक कालावधीसाठी पुन्हा त्या भागात येण्यास बंदी असते. परंतू, काही गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन लपून बसतात तसेच काहीजण उघडपणेही फिरतात. अशा गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करून पुन्हा बेड्या ठोकतात; परंतु, जे सापडत नाहीत, अशांचा तपास करणे गरजेचे आहे.
९ आरोपींवर मोक्कान्वये कारवाई
जिल्ह्यातील दोन गुन्हेगार टोळ्यांमधील ९ आरोपींवर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे तसेच टोळीप्रमुखांसह १६ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
अशांवर होते कारवाई
यात एकाच गुन्हेगाराने ४ ते ५ पेक्षा जास्त गुन्हे करणे, कायद्याचा आदर न करणारे, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, नुकसान करणे व दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली जाते.