मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:24+5:302021-06-06T04:14:24+5:30
परभणी : जिल्ह्यात केवळ तीन दिवसांसाठी मोबाइल साहित्य खरेदी-विक्रीची दुकाने उघडताच नागरिकांनी किरकोळ कामासाठी एकच गर्दी केली होती. ...

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
परभणी : जिल्ह्यात केवळ तीन दिवसांसाठी मोबाइल साहित्य खरेदी-विक्रीची दुकाने उघडताच नागरिकांनी किरकोळ कामासाठी एकच गर्दी केली होती. यामध्ये मोबाइल दुरुस्तीच्या किरकोळ कामासाठी गर्दी करणाऱ्यांनी स्वत:चे आरोग्यदेखील सांभाळणे गरजेचे आहे.
परभणी शहरात मागील आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यावर आला आहे. यातच सरत्या आठवड्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली होती. यामध्ये मोबाइल खरेदी आणि मोबाइल ॲक्सेसरीजची दुकाने उघडल्याने नागरिकांनी मोबाइलशी संबंधित कामे करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. शहरात जवळपास ५५ ते ६० मोठी मोबाइलची दुकाने आहेत. तसेच रस्त्यावर किरकोळ साहित्य विक्री करणारी १० ते १५ दुकाने थाटली आहेत. मागील ६० दिवसांपासून सर्वच बाजारपेठ बंद होती. त्यात मोबाइलची दुकाने बंद होती. यामुळे नागरिकांनी दुकाने उघडताच किरकोळ कामासाठी गर्दी केली होती. काम किरकोळ मात्र त्यासाठी कोणतेही नियम न पाळता नागरिक बिनधास्तपणे कोरोनाचा संभाव्य धोका विसरुन चार्जर घेणे, हेडफोन खरेदी करणे आणि स्क्रीनगार्ड टाकणे तसेच जुने मोबाइल खराब झाल्यास दुरुस्त करणे यासाठी मोबाइलचे दुकान गाठत आहेत. अनेक मोबाइल विक्रेते दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची व ग्राहकांची काळजी घेण्यासाठी त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यास बंधनकारक करत असल्याचे दिसून येते.
मोबाइल महत्त्वाचाच, पण आरोग्य?
लॉकडाऊनमध्ये जुना मोबाइल खराब झाला. नवीन घेण्यासाठी दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. यातच तीन दिवस दुकाने सुरू झाली, म्हणून नवीन मोबाइल खरेदी करण्यासाठी आलो.
- सागर वटाणे, नांदखेडा
मोबाइलशी संबंधित दुकाने सुरू होण्याची वाट पाहत होतो. जुना मोबाइल दुरुस्त केला तर अजून एक नवीन मोबाइल खरेदी केला. सर्व नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेत खरेदी-विक्री होत आहे.
- ऋषीकेश कुरेवाड, परळी
मोबाइल दुकानांमध्ये सर्व नियमांचे पालन करून ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. कर्मचारीसुध्दा मास्क घालून काम करत आहेत.
-रविप्रकाश कदम, विक्रेते
किरकोळ कामासाठी ग्राहक येत आहेत. कधी कधी गर्दी होते, अशावेळी काही ग्राहकांना दुकानाच्या बाहेर थांबवून नंबरप्रमाणे आत सोडले जात आहे.
-सिध्दांत आवाखे, विक्रेते
दोन महिन्यांपासून बाजार बंद
परभणी शहरात ६० दिवसांनंतर सर्व बाजारपेठ उघडली. यामध्ये मोबाइल विक्री व दुरुस्तीची दुकाने केवळ तीन दिवसांसाठी सुरू झाली होती. यामुळे नागरिकांची मोबाइल संबंधी कामे लॉकडाऊनमध्ये रखडली होती. ही कामे दुकाने सुरू असलेल्या तीन दिवसात अनेकांनी पूर्ण केली.
दुकानांमध्ये नियमांचे पालन
शहरात मोबाइल विक्रीची ५५ ते ६० दुकाने आहेत. यातील ४ ते ५ दुकानांची प्रत्यक्ष पाहणी केली असता सर्वच ठिकाणी ग्राहक आल्यास त्यांनी नियम पाळावेत यासाठी दुकानात मास्क घालणे बंधनकारक केले जात होते. तर सॅनिटायझर दुकानात ठेवल्याचे दिसून आले.